अनेक मुद्दे पटतायत पण मुळातल्या काही गोष्टी खटकतायत त्याचं काय?

>>आपल्या पूर्वजांचा अभिमान असणं ही बाब चांगलीच. मात्र त्यांच्या अभिमानापोटी त्यांनी केलेल्या चुकांचंही उदात्तीकरण करणे मात्र वाईट. <<
मला वाटत नाही मी आंधळेपणाने उदात्तीकरण करण्याबद्दल काही म्हणाले होते. झालेल्या चुकांना नाकारत नाहीये मी पण म्हणून मिळालेले संस्कार १००% वाईट/ अयोग्य आणि 'त्या' समाजात जन्मले म्हणून अपराधीपणाने मी वागावं याला माझा विरोध आहे.

>>पण आजचे तुमचे वागणे तरी योग्य असू द्यात. आपल्याला सोईस्कर अश्या तुलना करायच्या. आपल्याला अनुरूप असेल तोच मुद्दा उचलायचा, जमेल तर मुद्द्यांसहित विरोध( याचे स्वागत आहे) न जमेल तर टिंगल, टवाळकी, उपहास किंवा भ्रम उत्पन्न करण्यात यांचा हातखंडा. <<
याला वैयक्तिक पातळी गाठणे असे कुणी म्हणाले तर चालेल तुम्हाला? कारण कुठल्याही वादात आपल्याला सोयीस्कर असा मुद्दा पकडूनच कोणीही बोलत असते. तुम्हीही त्याला अपवाद नाही. तसेच उपहास, भ्रम इत्यादी इत्यादींमधेही.. आपल्याच खाली उद्घृत केलेल्या वाक्यांत याचे उदाहरण दिसत आहे. असो..

>>अशानं आपल्या समाजाचे तुकडे होत जातील. आता होतील हे आमचं मत मात्र यांच्या मते हा समाज आधीच चार तुकड्यात वाटल्या गेला होता. पण तेही सहन न झाल्याने, म्हणे यांच्या एका पूर्वजाने तेवीसवेळा पृथ्वी नि:क्षत्रिय केली. म्हणून आता वर्ण दोनच. म्हणजे यांच्या मते या समाजाचे दोन तुकडे. हे असणं यांची परंपरा आम्ही मानावी का?<< समाजाचे तुकडे होऊ नये असे खरोखरच तुम्हाला वाटते का? कारण 'यांच हे अमुक, यांची ही भाषा' इत्यादी इत्यादी शब्दातून केवळ एका समाजाची सतत निंदा आणि त्या समाजातील प्रत्येकाला सतत हे ऐकवणे हा एक कलमी कार्यक्रम दिसतो. आणि अश्याने समाजाचे तुकडे होणार नाहीत हा ही ठाम समज.

>>आमचं म्हणणं असं की आमचे पूर्वज वाईट नव्हते. त्यांना दिलेल्या या हीन वागणुकीचा आम्ही निषेध करतो, तर यांना त्यांच्या हीन नसण्याचा पुरावा आम्ही द्यावा असं अपेक्षीत आहे??? <<
आज आम्हीही तुमच्या पूर्वजांना नावं ठेवत नाही आहोत. आणि तुम्हाला सुद्धा. त्या हीन वागणुकीचा निषेध आम्हीही करतो पण तसं म्हणलं की तुम्ही लगेच 'काय उपकार करता काय..' म्हणून अंगावर येता. ते एक असो. वारकऱ्यांनी ज्ञानेश्वर ब्राह्मण होते म्हणून ग्यानबा तुकाराम न म्हणणं पासून दादोजी कोंडदेव आणि रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू नव्हतेच ही ब्राह्मणांची चाल आहे इत्यादी गोष्टींबद्दल काय म्हणायचंय आपल्याला?  शिवचरीत्रातल्या या गोष्टी पुराव्यासकट शाबीत करून देऊ शकणारे इतिहासतज्ञ पुरंदरे आणि बेडेकर म्हणून तुम्ही मानत नाही. बेडेकरांना धमक्या दिल्या जातात 'आमच्या' शिवाजी महाराजांबद्दल काही बोलात तर याद राखा. हे फक्त एक उदाहरण मुद्दा स्पष्ट करण्यासाठी की आजवर जे काही इतिहासात वाचलं होतं त्यातलं माझ्या समाजाबद्दल जे चांगलं लिहिलेलं होतं ते खोटं होतं आणि तुम्ही म्हणता म्हणून ते खोटं होतं बाकी कुठलाही पुरावा नाही.

>>हिंदू धर्मातील विविध ग्रंथांत इतर जातींना हीन लेखणारे उल्लेख नाहीत का?<<
आहेत. ते कदाचित त्या त्या काळाला योग्य असेल नसेल पण ते माणुसकीच्या दृष्टीकोनातून पूर्णपणे अयोग्य आहे.

>>केवळ जन्मतः कुणी हीन वारसा घेऊन जन्मतो यावर तुमचा विश्वास आहे का? <<
अर्थातच नाही.

>>माझ्या सगळ्या वंशाला शिव्या देणाऱ्या ग्रंथाला मी माझा धर्मग्रंथ कसा मानू?<<
मुळीच मानू नका पण अमान्य करण्याआधी ते तिथे तसे का? याचा थोडा अभ्यास तटस्थ वृत्तीने करायचे कष्ट घ्याल का? मी मनुस्मृती वाचलेली नाही पण इतपत वाचलेय जेणेकरून हे माहितीये माहितीये की मुळातल्या मनुस्मृतीवरून याज्ञवल्क्याने जी टिका केली ज्याला याज्ञवल्क्य स्मृती मानले जाते त्यातून ह्या असमतोल आणि शोषणावर आधारीत व्यवस्थेचा पाया अधिक पक्का झाला. हे घडले ९व्या - १०व्या शतकाच्या सुमारास. तोवर चातुर्वर्ण्य अस्तित्वात होता पण त्याचे जाचक स्वरूप नव्हते. इंन्डॉलॉजी हा माझा आवडीचा विषय असल्याने थोडीफार माहिती. असो.

>>या ग्रंथांचा आद्य कर्ता जरी कुणी वेगळा असला तरी आपल्या मनाने मानस चित्रण केलेला प्रकार आपल्या धर्मात नवा नाही. मग तरीही त्याच सर्व गोष्टी मी खऱ्या का मानाव्या? <<
प्रश्नाचा पहिला भाग नीटसा कळला नाही पण आज धर्मग्रंथातल्या किती गोष्टी कोण खऱ्या मानतो हाच मुळात संशोधनाचा विषय ठरेल. विश्वास ठेवा अगर नको मी तर अर्ध्या गोष्टी मानत नाही. तुम्ही तुम्हाला पटेल त्यावरच विश्वास ठेवा पण पूर्वग्रहदूषित विचारांनी नको एवढंच म्हणायचंय.

>>माझी भूमिका समजावण्याचा प्रयत्न दुर्लक्षून केवळ आपलं पूर्वग्रह भारीत मत ठोकल्या जातं याला काय म्हणावं?<<
हे मीही आपणासाठी म्हणू शकते तेव्हा तो मुद्दा बाजूला.   

>>थोडक्यात काय तर आपल्या पूर्वजांबाबत अकारण अहं ठेवणे वाईटच. पहिल्या बाजीरावांचा आदर नक्कीच आहे, मात्र तो त्यांच्या कर्तृत्वाचा; वंशाचा नव्हे. तसेच दुसऱ्या बाजीरावाबद्दल केवळ तो 'या' वंशाचा म्हणून आदर बाळगायचा का?<<
याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. इतिहासातही दुसऱ्या बाजीरावाला पळपुटा म्हणूनच हिणवले गेले होते हे विसरून चालणार नाही.  

>>कुणी स्वतःला उच्चवर्णीय मानत असेल तर त्याला माझा विरोध आहे.<< माझाही विरोध आहे म्हणून तर मी स्वतःला तथाकथित उच्चवर्णीय म्हणते आहे. जातीच्या नावाचा उल्लेख टाळावा म्हणून पण ते मी उपहासात्मक बोलते आहे असा समज तुम्ही का करून घेतलाय?

>>आजवर तुम्हाला शिव्या देण्याची किंवा ऐकण्याची सवय असेल. माझं मत असं आहे की येथे एक तर हिंदू धर्मात असलेल्या या असमानतेचा विरोध करा किंवा समर्थन करा. पण कुठेही कुणालाही अकारण शिव्या नको. मुद्दे द्या , मुद्दे !<<
माझ्या आधीच्या लिखाणातील शिव्या शोधून द्या मला. मला शिव्या देण्याची वा ऐकण्याची सवय फक्त ऍक्टर्स वर्कशॉप पुरतीच आहे आणि ती तिथेच ठेवायची असते हे मला माहितीये. असमानतेचे समर्थन करण्याचा प्रश्नच नाही त्याला विरोध आहेच पण म्हणजे विरोधाची तुम्ही म्हणाल तीच पद्धत योग्य कसे काय? त्या पद्धतीला विरोध दाखवण्याची मुभा का नाही? आणि ती मुभा देणे न देणे हा तुमचा अधिकार कसा काय? बर आधीचे लिखाण म्हणजे तुम्हाला केवळ अकारण शिव्याच आणि काहिहि मुद्दे नाहीत असे वाटत असेल तर तुम्हाला चर्चा नाही केवळ टाळ्या आणि सहमती अपेक्षित आहे असा निष्कर्ष काढावा का?