सर्वसाक्षीजी,
छायाचित्रे व रसग्रहण उत्तम. तुमच्या या पैलूशी नवीनच ओळख होते आहे.
प्रभाकरपंतांच्या अभिनयाविषयी बाकी मला थोडेसे वेगळे लिहिणे भाग आहे. संगीत नाटकांपासून सामाजिक नाटकांपर्यंतचा मराठी नाट्यभूमीच्या प्रवासात कलाकारांचा अभिनय बहुदा साचेबंद, अवास्तव आक्रस्ताळी आणि कृत्रीमच होता. प्रभाकर पणशीकर, चित्तरंजन कोल्हटकर, काशीनाथ घाणेकर आणि काही अंशी श्रीराम लागूही याच परंपरेतला अभिनय करायचे. घाणेकरांच्या अभिनयाविषयी नेहमी सांगितले जाणारे 'अहो, काय थोर तो तुमचा ऍक्टर - 'रायगडाला...' बघा - हुबेहूब संभाजी! अश्रूंची झाली फुले बघा- हुबेहूब संभाजी!, 'मला काही सांगायचंय बघा- हुबेहूब संभाजी!'  हे वाक्य घाणेकरांनाच नव्हे, तर त्या काळातल्या इतर सर्वच कलाकारांना लागू होते. अर्थात त्या काळातील प्रेक्षकांची आवड, त्या काळात लिहिल्या जाणाऱ्या संहिता यांच्या पार्श्वभूमीवर ते कदाचित कालसंगतही असेल. 'तो मी नव्हेच' मध्ये फिरता रंगमंच आणि पंतांचे झटपट वेशभूषा बदलून येणे असे काही नवीन यू.एस.पी. होते, त्यामुळे ते नाटक तुफानी लोकप्रियही झाले, पण त्यातल्या अभिनयाचा दर्जा - अगदी पंतांचा सुद्धा - सुमारच राहिला. त्यांचे कोर्टातले ते पाय हलवत तोंड पेचणे आणि शेवटी ' तो... मी... नव्हेच!' म्हणणे हे आज कमालीचे बेगडी आणि कृत्रीम वाटते. शिवाय त्या भूमिकांसाठी त्यांनी जो एक खास (खोटा) आवाज लावला, त्या आवाजाने बाकी त्यांची आयुष्यभर साथ सोडली नाही. त्यानंतरच्या सगळ्या नाटकांत, मालिकांत पंतांचा तोच बेअरिंगी आवाज राहिला. पंतांच्या अभिनयाची ही सगळ्यात मोठी मर्यादा ठरली असे मला वाटते.

अर्थात त्या काळात असा राजकपूरी 'लाऊड' अभिनय किंवा दिलीपकुमारी 'अंडरप्ले' असे दोनच अभिनयाचे पर्याय होते. अंडरप्ले हाही काहीवेळा तितकाच तापदायक ठरत असे. ( राजेश खन्ना -'अमरप्रेम') डॉक्टर लागूंचा अभिनयही- विशेषतः हिंदी सिनेमातला (जुर्माना, इन्कार, हेराफेरी, लावारिस) असाच अंगावर येणारा व बटबटीत होता. 'पिंजरा' मधील त्यांच्या अभिनयाचा भडकपणा शांतारामी परंपरेशी सुसंगतच होता. 'सामना' मध्ये जब्बार पटेलांनी त्यांना नैसर्गिक अभिनयाच्या जरा जवळ आणले खरे, पण जब्बारकडेच ते 'सिंहासन' मध्ये परत नाटकी झाले (विशेषतः अरुण सरनाईक व सतिश दुभाषींच्या सहजसुंदर अभिनयापुढे). त्यानंतर बाकी लागूंनी या छापाच्या अभिनयातून बाहेर पडण्यासाठी विशेष प्रयत्न केले व 'मित्र' पर्यंत ते त्यात बऱ्यापैकी यशस्वी झाले असे जाणवते. असा कोणताच बदल पंतांच्या अभिनयात झालेला दिसत नाही.

आज प्रेक्षकांना किमान काही अंशी तरी नैसर्गिक अभिनय बघण्याची सवय झाली आहे. कै. अरविंद देशपांडे, मोहन जोशी, विक्रम गोखले, दिलीप प्रभावळकर यांच्या संयत आणि उत्स्फूर्त अभिनयासमोर आज प्रभाकरपंतांचा अभिनय कालबाह्य झाल्यासारखा वाटतो. अर्थात ज्या परंपरेत पंतांचा अभिनय विकसित झाला, तिचा विचार केला तर पंच्याहत्तरीच्या पंतांनी आता वेगळा विचार करणे अपेक्षित नाही. पण नट म्हणून पंतांचा विकास एक टप्प्याशी येऊन थांबला, म्हणून मराठी रंगभूमीला एवढे मोठे योगदान देऊनही पंतांचा उल्लेख 'ऑल टाईम ग्रेट' मध्ये करता येईल का, याविषयी शंका वाटते.