सर्वसाक्षीजी,
एखाद्या कलाकाराचा 'परफॉर्मन्स' आवडणे किंवा न आवडणे या व्यक्तीसापेक्ष गोष्टी असू शकतात, नव्हे त्या तशा असतातच (अहो, काय सांगू, गाडीत तलतची कॅसेट लावताच तोंड आंबट करणाऱ्या सहकाऱ्याला बरोबर घेऊन मी शेकडो मैल प्रवास केला आहे हो!). पण काळाच्या ओघात निके सोने टिकून रहाते. बलराज सहानी, मोतीलाल हे जग सोडून गेले त्याला कित्येक वर्षे झाली, पण हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे मानदंड म्हणून त्यांचे नाव अद्यापही टिकून आहे. अगदी ओबडधोबड तुलना करायची तर प्रभाकरपंतांचा अभिनय हा पृथ्वीराजकपूरच्या शैलीचा आहे, असे मला वाटते. त्याला मोतीलालचा 'क्लास' नाही. अर्थात हे माझे अगदी वैयक्तिक मत.
पंत व डॉक्टर हे दोन अभिनेते, त्यांच्या काही भूमिका, त्यातला त्यांचा सुमार वा भिकार अभिनय तसेच ती भूमिका कुणी अधिक समर्थ्याने पेलली असती ते सविस्तर लिहा.
माफ करा, पण इतका माझा अधिकार नाही. पंत व डॉक्टरांना मी सरसकट सुमार ( आणि भिकार तर नाहीच नाही!) ही म्हटले नाही. आणि कुणी कुठली भूमिका कशी केली असती या 'जर-तर' ला कलाक्षेत्रात काही अर्थ नाही. एक नट म्हणून पणशीकरांचे विशिष्ट स्थान आहे. प्रेक्षकांनी त्यांना भरभरून प्रेमही दिले आहे. पण त्यांचा अभिनय हा कुठेतरी थांबलेला, गोठलेला वाटतो. अशोककुमारचे उदाहरण घ्या. बायल्या, शामळू नायक ते मुरलेला चरित्र अभिनेता ही अभिनयाची उत्क्रांती त्याच्या प्रवासात दिसते. एक कलाकार म्हणून अशी वाढ पंतांच्या अभिनयात दिसत नाही, असे मला वाटते. आणि असा हरहुन्नरीपणा नसला की कलाकाराची वाढ खुंटते. (तुम्ही मला दिलेल्या तबकडीत दिलीपकुमारने तलतविषयी असेच काहीसे म्हटले आहे!)
रुचिभिन्नता असणारच, त्यात गैरही काही नाही. आपल्या मताशी ठाम रहाताना दुसऱ्याच्या मताविषयी आदर असणे महत्त्वाचे. तुमच्या प्रतिसादातून तुम्ही हे पाळलेले जाणवते. धन्यवाद.