आपली विद्रोही साहित्याची व्याख्या पटतेय आणि त्याच वेळेला अपूर्ण ही वाटतेय. पण सांगता येणार नाही कारण माझा अभ्यास नाही.
>>आता थोडं आपल्या आजच्या समाज व्यवस्थेकडे जाऊया. .......... आमचेच असं म्हणणाऱ्या प्रवृत्तीचा जाहीर निषेध. नीलकांत <<
आपल्या लिखाणातल्या या सर्व भागाबद्दल दुमत असण्याचे कारण नाही. पण मला खरं खरं सांगा हे इतक्या आदर्श रितीने घडते का? मलातरी दिसताना उलटे चित्र बघितल्याचे आठवतेय. माझे अनुभव मला सांगत नाहीत की हे असेच घडते.
रामायणाबद्दल बोलाल तर.... माझ्यासकट अनेक जण त्यातल्या अनेक गोष्टींना नाकारतात. नुसते शंबूकाचेच उदाहरण नाही तर इतरही अनेक गोष्टी. बाकी रावणाबद्दल म्हणायचे झाले तर खरंतर सगळ्या कर्मकांडाला दिलेली ती एक चपराक आहे असे माझे मत आहे. रावण हा दशग्रंथी ब्राह्मण होता. त्या समाजव्यवस्थेमधे दशग्रंथी ब्राह्मण असणे आणि तोही राजा असणे ह्याला नक्कीच मोठे स्थान होते पण त्या स्थानाच्या आणि ज्ञानाच्या बळावर माजून त्याने दुसऱ्याची पत्नी (किंवा त्या काळच्या हिशोबाप्रमाणे संपत्ती) पळवली. हे पातक तो स्थानाने, ज्ञानाने कितीही मोठा असला तरीही समूळ नायनाट या प्रायश्चित्ताच्या तोडीचे होते. तेव्हा तुमचे स्थान आणि ज्ञान याबरोबर येणारा अहंकार तुमच्याच नाशाला कारणीभूत होईल हा आणि एवढाच बोध मला रामायणातून मिळतो. आणि ही काही छोटी गोष्ट नाही. बाकी सगळ्या कथा उपकथांना मी नगण्य महत्त्व देते. जे रामायणाचे तेच महाभारताचे वा गीतेचे. असो.
आता हिंदू धर्माबद्दल म्हणाल तर सगळं काही मान्य पण तरीही मला जेव्हा दिसतं की चार्वाक किंवा तत्सम अनेक विचारधारांनाही आपल्या धर्माच्या ग्रंथांमधे स्थान दिले आहे तेव्हा मला माझा धर्म इतर अनेक धर्मांपेक्षा सहिष्णू वाटू लागतो. आणि लवचिकही. पुरेश्या अभ्यासानंतर तुम्हाआम्हाला पटेल आणि जास्तीतजास्त समाजाचे भले होईल अशी समाजरचना आपण निर्माण केली तर माझ्यामते तेही हिंदू धर्माचे नवीन रूपच असेल. माझा स्वतःचा धर्मांतरावर मुळीच विश्वास नाही कारण तुम्ही जन्माला येऊन मिळालेले संस्कार पुसून टाकून आजपासून मी बीफ खाणार, रविवारी प्रार्थना करणार आणि क्रॉसची खूण करणार किंवा डुक्कर खाणार नाही, दिवसातून ५ वेळा नमाज पढणार याला काही अर्थ मला दिसत नाही. हे सगळं खूप वरवरचं आहे.
जात टाकून देण्यासाठी केलेले धर्मांतर प्रतिकात्मकरीत्या फार मोठे आहे खरेच पण प्रत्यक्षात समाजाच्या भल्यासाठी नक्की काय घडले त्यातून हा मला पडलेला प्रश्न. परिस्थिती बदललेली नाही आणि ती बदलावी अशी चाड असलेले नेतेही दिसत नाहीत. आज आमची कामवाली मला सांगते, "अहो ताई, तुमच्यामधे बरं आहे. तुम्हाला बाहेर काम करू देतात. पाहिजे तेव्हा माहेरी येऊ देतात. पण आम्ही बुद्धाचे ना. आमच्यात मुलाकडच्यांची दादागिरी जास्त. पोरगा तर दारू पितो आणि काम करत नाही पण हुंडा मात्र पाहीजे आणी आईला फोन करायलाही मुलीला घराबाहेर पडू देत नाहीत." हे आणि असे अनेक काही एकल्यानंतर धर्मांतराने प्रतिकात्मक नकार आणि जातीचा उल्लेख गाळून बुद्धाची असा एक नवीन जातसदृश वाक्यप्रयोग यापलीकडे साधले काय हे कळत नाही.
असो विषय फारच भरकटला..