त्सुनामीच्या धोक्याची सूचना साधारण तीन तास ते एक मिनिटे आधी देता येते. सागरतळाशी भूकंप झाल्याची नोंद होताच आधी सावधगिरीची सूचना देण्यात येते. त्सुनामी निर्माण झाल्याचे लक्षात येताच तातडीची सूचना देण्यात येते. भूकंपाच्या केंद्रापासून त्सुनामी सर्व दिशांना पसरते. जवळच्या किनाऱ्याला तातडीची सूचना काही वेळेला त्सुनामी किनाऱ्यावर येण्याच्या अगदी मिनिटभर आधी देता येते. लांबच्या प्रदेशांना त्सुनामीचा वेग, किनाऱ्याचे अंतर वगैरेंनुसार काही मिनिटे ते काही तास अगोदर सूचना देता येते.

ही सूचना जास्तीत जास्त लवकर देता यावी म्हणून त्सुनामीचा शोध घेणारी तरंगती केंद्रे अधिकाधिक तत्पर बनवणे, त्सुनामी प्रारूपे अधिकाधिक अचूक तसेच तत्पर करणे ह्या दिशेने सतत प्रयत्न चालू असतात. ह्या लेखामध्ये नोआने तयार केलेल्या नव्या, सुधारित यंत्रणेची आकृती दिली आहे (आकृती ४). ह्या यंत्रणेमध्ये अद्ययावत तंत्रज्ञान वापरून सुधारणा केलेली आहे.