श्री टगे राव ,
मला जातीवाचक आणि त्यातल्या त्यात कुण्या एका जातीला मोठेपण किंवा दूषण देणारे वाक्प्रचार व्यक्तिशः आवडत नाही. म्हणून माझा या 'देवा- बामनाच्या साक्षीने..' ला विरोध. अहो तुम्ही आता देताय ते स्पष्टीकरण तुम्हाला मला पटेलही. मात्र समाजात संदेश असा जातो की 'वरती तो' आणि 'खालती हे' हेच आमचे तारणहार. याच मुळे तर सगळा गोंधळ झाला हो ! हा 'देवा-" चा दुसरा वाक्प्रचार शिवाजींच्या संदर्भात नव्हता. अन्य होता.
प्रियालींनी उल्लेख केल्या प्रमाणे आपल्या संस्कृतीत आठ प्रकारच्या विवाहांस मान्यता होती. त्यात देवविवाह, गांधर्वविवाह, आणि राक्षसविवाह आदी होते. यांच्या नावावरून त्या-त्या वंशाचे हे विवाह नसून त्यांच्या पद्धतीवरून ही नावे पडली आहेत. कालिदासाच्या दुश्यंत व शकुंतलेचा गांधर्वविवाह झालेला होता. कुणाचं हरण करून बळजबळीने केलेला विवाह राक्षसविवाह मानल्या जात असे. असो.
अभयसर,
शिवाजींच्या आधीच्या काळापासून सर्वत्र मोगलांचाच पगडा होता. सर्वत्र लोक आपापल्या जहागिरीत खूश होते. केवळ लोक खूश राहावेत अशी महाराजांची भूमिका असती तर मग महाराजांनी दिल्लीश्वराला खूश करून किल्ले वगळता आपली पुण्या-सुप्याची जहागीरी पार वऱ्हाडापर्यंत सहज वाढवली असती.
केवळ लोकानुनयासाठी महाराज असं करतील असं वाटत नाही. आणि हो , हे बिरुद लावल्या गेलं ते राज्याभिषेकानंतर , तो पर्यंत महाराज स्वराज्यातील जनतेच्या हृदय सिंहासनावर अढळपद मिळवून बसले होते. माफ करा हे स्पष्टीकरण तितकंसं पटत नाही.
अज्जुका,
नेमकं अपूर्ण काय वाटतेय ते कळवा. आणि हो ही माझी व्याख्या आहे. त्यामुळे या न्युनत्वाचा दोष केवळ माझा.
आता आदर्शाचं आणि वास्तवाची सांगड घालूया. तुमचं म्हणणं खरं आहे. वास्तवात एक भीषण विरोधाभास आहे. तो तितकाच कटू आहे. पण एक लक्षात घ्या आदर्श ठरवूनच त्यांच्या कडे वाटचाल करावी लागते. तरच आपण ठरवलेल्या धेय्या कडे जातो अन्यथा वाटेत अनेक वाटा लागतात. अशीच एक चुकीची वाट आमचे आंबेडकरी बांधव स्वीकारताना दिसत आहेत. ती म्हणजे ख्रिस्तीकरण.
अशी कित्येक उदाहरणे आहेत की ज्यांत ही अशी आदर्श आणि वास्तवातील तफावत दिसते. मात्र म्हणून तो प्रयोग फसला असं होत नाही. आपल्या जवळचं उदाहरण घेऊ. आपली राज्यघटना ! त्यात स्पष्ट उल्लेख आहे. लोककल्याणकारी राज्य. आणि असे कित्येक कलमं आहेत की ज्यांना केवळ कलम क्रं. *** एवढंच महत्त्व आहे. आपल्या घटनेतील मार्गदर्शक तत्त्वे तर देखावाच आहे. तरी सुद्धा ते आवश्यक आहेत. आपल्या घटनाकारांचं स्वप्न ते बोलून दाखवतात. सर्वांचं असं असतं कुणाला रामराज्य हवं असतं तर कुणाला अशोकाचं.
आता रामायणाबद्दल , अहो तुमचा आणि माझा प्रश्नच नाही. आपण राम आणि रावणाला माणूस म्हणून मोजू शकतो. माझा प्रश्न आहे तो आमच्या हजारो धर्मभोळ्या , खेड्यातल्या बहुजन समाजासाठीचा ज्यांना धर्मपालन म्हणजे पुरोहित वर्ग सांगेल ते, असा प्रकार आहे. त्या मोठ्या वर्गापर्यंत हा पुरोहित वर्ग एक चुकीचा संदेश पोहोचवतो आहे असं नाही वाटत? माझ्या मते रामायणातील असे अनावश्यक जातीवाचक उल्लेख आमच्या धर्मपीठाने काढून टाकायला हवेत. त्यांनी केलं तरच ते आधिकारीक होईल याची मला जाण आहे. आणि हो माझ्या धर्मपीठाने आता तरी समाजाभिमुख व्हावं अशी माझी इच्छा. तुमच्या मठात राहून केवळ पूजापाठात मग्न राहण्याचा काळ गेला आता. चहूबाजूंनी धर्माच्या वर्मावर आघात होत असताना यांना स्वस्थ बसवतं तरी कसं?
माझ्या धर्माबद्दल आणि माझ्या समृद्ध वारशाबद्दल मला खरोखरच अभिमान आहे.
१९५६ च्या आधी किमान जीवनमान दर्जाची सुद्धा आपली लायकी नाही. अशी ज्यांची पिढ्यानं पिढ्या समजूत होती त्यांना बाबासाहेबांनी आपल्या पायावर उभं राहायला शिकवलं, शिकायला आणि लढायला शिकवलं. त्या समाजाकडून आपण ताबडतोब आदर्श वागणुकीची अपेक्षा कशी ठेवू शकतो? ठेवावी असं मलाही वाटतं, पण कित्येक बहुजन हिंदू जातींत सुद्धा हे चित्र आहेच की !
त्यांनी धर्म बदलला त्याला कारण हिंदू म्हणून त्यांना माणूसपणाची सुद्धा ओळख द्यायला आमचे धर्मपीठ तयार नव्हते. त्यांना आपल्या समांतर व्यवस्था तयार करायची असती आणि आपल्या धर्माला आव्हान द्यायचे असते तर कित्येक वाटा मोकळ्या होत्या आणि पैशाच्या पेट्या भरलेल्या होत्या.
अतिशयोक्ती म्हणून नाही बोलत त्यांनी जर का दुसऱ्या धर्माचा स्वीकार केला असता तर? देशाचे तुकडे होण्याची ती नांदी असती. देशाला नेहमीच अग्रमाण देऊनच बाबासाहेबांनी प्रत्येक कृती केलेली आहे. तेच बाबासाहेब जे असं म्हणाले होते की ' मला मातृभूमी नाही' .
हळूहळू धम्मानुयायी बदल करतील. ती जवाबदारी त्यांची, मला माझ्या घराची काळजी आहे. आणि किती काळ याला छिद्रे पडत राहणार आहेत? मी असा वागतो, मी तसा वागतो, असं बोलून आपली जवाबदारी संपत नाही. आम्ही हिंदू म्हणून कधी वागणार?
सर्कीटराव,
खरं तर तुम्हाला तुमच्या नावानं हाक मारायला आवडेल, पण नावावरून असाच वाद झाला होता म्हणून टोपणनावच जवळ केले. असो, तुम्ही नेहमीच माझं कौतुक करता त्याबद्दल आभार.
तुमच्या प्रश्नावर तसं माझं सविस्तर वाचन झालेलं नाही मात्र त्याकाळाबद्दल माझं वाचन आहे त्यावरून माझं मत खाली देत आहे.
१९३५ पासून आलेल्या नव्या कायद्यानुसार येणारी निवडणूक लढवण्यात सगळी कॉग्रेस व्यस्त होती.
गांधी आणि आंबेडकरांचं सख्य नव्हतं उलट दुसऱ्या गोलमेज परिषदेला दोघांतील वाद जगजाहीर झाला होता. पुढे पुणे करार झाला मात्र कटुता राहिलीच. बाबासाहेबांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग नव्हताच. त्यांचं पूर्ण लक्ष आपल्या समाजाच्या विकासाकडे होतं. त्यासाठीच त्यांनी सायमन कमिशन समोर साक्ष दिली. तिन्ही गोलमेज परिषदांना हजेरी लावली. स्वतंत्र मतदार संघ मिळवले. व्हाईसरायच्या मंत्रिमंडळात मंत्रिपद मिळवले. हे सर्व ते ज्या भूमिकेतून करीत होते ती भूमिका आज सुद्धा लोकांना समजायला कठीण आहे. तेंव्हाचा काँग्रेसच्या पुढाऱ्यांचं काही बोलायलाच नको. गांधीजींना न मानण्याचं पाप बाबासाहेब नेहमीच करीत होते.
नाही म्हणायला काही नेत्यांनी त्यांची या संदर्भात भेट घेतली होती. एके ठिकाणी डॉ. हेडगेवारांनी सुद्धा त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केल्याचं वाचलेलं आहे. मात्र आंबेडकरी साहित्यात त्याचा उल्लेख नाही. संघाच्या साहित्यात आहे.
बाबासाहेब संत गाडगेबाबांना आपले गुरु मानीत. बाबासाहेबांचा हा निर्णय गाडगेबाबांना तितकासा पटला नव्हता. मात्र बाबासाहेबांवर त्यांचा सुद्धा विश्वास होता. जेव्हा हा धर्मसोडून कुठला पत्करावा असा संभ्रम बाबासाहेबांच्या मनात होता तेंव्हा त्यांनी गाडगेमहाराजांचा सल्ला घेतला. त्यावर गाडगेमहाराजांचं मत होतं की तुमच्या कुठल्याही वर्तनाने देशाचं नुकसान होणार नाही अशी वाट धरा. तेंव्हा बाबासाहेबांनी धम्मदिक्षा नक्की केली.
नीलकांत