किस्सा अभ्यासाचा आवडला. एका इंग्रजी दैनिकातला मला आवडलेला किस्सा  अभ्यासाचा देत आहे.  मागच्या आठवड्यात कामानिमित्त मी भोपाळला गेलो होतो. माझ्या डब्यात एक चौकोनी कुटुंब, नवरा, बायको व त्यांच्या  १० व ७  वर्षाच्या दोन मुली होत्या.मुली खूपच लाघवी व बोलक्या होत्या. बोलण्याच्या ओघात कळलं की त्या चंदीगढच्या केंद्रीय विद्यालयात शिकतात व त्यांचे वडील वायुदलात अधिकारी आहेत.

जरा स्थिरस्थावर झाल्यावर कामाच्या गडबडीत वाचायचा राहून गेलेला द हितवाद काढला. शनिवार असल्यामुळे त्याबरोबर मुलांचे साप्ताहिक ट्विंकल स्टार होते. मुलांचे साप्ताहिक पाहून मोठीने चटकन मागून घेतले. थोड्याच वेळात त्यांचे साप्ताहिक वाचून व त्यातली काही कोडी स्वतः तर काही वडिलांच्या मदतीने सोडवून झाली.

"आता मी तुम्हाला एक कोड घालतो", बाबा म्हणाले. मुली उत्सुकतेने कोड ऐकायला लागल्या. "एक पोलिस चोराचा पाठलाग करत असतो. पळता पळता समोर एक रेल्वे क्रॉसिंगवरून ट्रेन जात असते, चोर पहिल्या आतून बंद असलेल्या डब्यात चढतो व पोलिस शेवटच्या. पोलिसाने गोळी झाडली पण अंतर जास्त असल्यामुळे गोळी चोराला लागत नाही. आता सांगा पोलिसाने चोराला कसं पकडलं असेल?" बाबांनी विचारलं. " त्यात काय अगदी सोप्प   आहे. पोलिस डब्यावर चढला असेल आणि धावत धावत  जाऊन चोराला पकडलं असेल, हिंदी सिनेमात हिरो असच करतो." धाकटी म्हणाली. "दोघांच्याही पायाला ओलं डांबर लागल्यामुळे दोघही चिकटून जातात." बाबांनी कोड्यात टाकलं. त्या दोघींबरोबर मी पण विचारमग्न झालो. "बाबा, हरलो सांगा ना उत्तर" दोघी एकदम म्हणाल्या. " थोड्या वेळ थांबा उत्तर दिसेल."  उत्तर दिसेल? मोठीने आश्चर्याने विचारलं. थोड्याच वेळाने ट्रेन जेव्हा वळणावर आली तेंव्हा बाबांनी मुलींना खिडकीतून बाहेर पाहायला सांगितलं व विचारलं की आता तुम्हाला पहिला डबा जवळ आलेला दिसतोय का? आता सांगा कोड्याच उत्तर. हं... आत्ता कळलं बाबा. पोलिसाने वळणावर चोराच्या पायावर गोळी मारली असेल." मोठी उत्तरली. "अगदी बरोब्बर" बाबा शाबासकी देत म्हणाले. कागद, पेन काढून समजावू लागले. जीवा, त्रिज्या, व्यास ,परिघ म्हणजे काय, चाप कशाला म्हणायचे, जीवा ही चापापेक्षा लहान असते ........ मी पण त्या दोघींबरोबर अभ्यासात दंग झालो.