माझ्या एका मित्राने हा लेख मला गेल्या आठवड्यात पाठविला. मूळ स्त्रोत बहुदा सकाळ किंवा कोण्या दैनिकाचा असावा. सदर चर्चेशी संबंधित असल्याने आणि मला लेखातील टिपण्णी आवडल्याने येथे पुरवितो आहे. ... एकलव्य
सेकंड थॉट - या "भावांशी' आमचं नातं काय?
( संजय पवार )
मागच्या पंधरवड्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन भावांत मारामारी झाली! दोन भावांत म्हणजे त्यांच्या समर्थकांत! (हे अगदी "ठाकरे' परंपरेला धरून झालं! कारण- कुठल्याही आंदोलनात सेनापतींना ना कधी अटक झाली ना कधी ते तुरुंगात गेले! अपवाद ६९ च्या दंगलीचा); पण सर्व वर्तमानपत्रांत बातम्या-लेख असे आले, की जणू या दोन भावांनीच एकमेकांची डोकी फोडली! आमचा कोकणातला माणूस म्हणेल- आवशीचो घो ह्येंच्या! भावाभावातला भांडान म्हंजे काय ता बघुचा असात, तर सिंधुदुर्गात या!
तर आम्हाला प्रश्न पडला, माध्यमांनी या दोन भावांच्या मारामारीने मराठी माणूस दुखावला, खंतावला, दुःखी-कष्टी झाला वगैरे जे चित्र रंगवलं, ते कशासाठी? दोन मराठी लोक एकमेकांत भांडले ही मुळी बातमीच नाही! दुसरं म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं मराठी माणसांशी नातं काय? मराठी माणूस म्हणजे शिवसैनिक किंवा परळ, लालबाग, दादर इथे राहणारा मराठी माणूस अशीच जर व्याख्या असेल, तर मग प्रश्नच सुटला!
१९६६ साली शिवसेनेची स्थापना झाल्यापासून आज २००६ साली, संघटनेला-पक्षाला ४० वर्षं झाली. या ४० वर्षांत मराठी माणसाच्या नावाने सुरू झालेल्या या संघटनेनं मराठी माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी काय केलं? या ४० वर्षांत पाच वर्षं राज्यात, तर एक ते दोन वर्षांपासून १० ते २० वर्षांपर्यंत विविध महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायती इथे सेनेची वा युतीची सत्ता होती, आहे. (शिवाय केंद्रात पाच वर्ष "रालोआ'चा घटक म्हणून!)
या ४० वर्षांत मुंबईतील मराठी माणसाची टक्केवारी कमी झाली! पालिकेत सेनेची सत्ता असूनही फेरीवाल्यांपासून दुकानदारीपर्यंत सर्वत्र परप्रांतीयांची मक्तेदारी झाली! आता यावर ठाकरे कुटुंब नेहमीप्रमाणे देशाच्या घटनेवर वगैरे खापर फोडेल! पण दृष्टी नसेल, तर सृष्टी उभारणार कुठून? याच मुंबईत गोरेगावात, मृणाल गोरेंनी "नागरी निवारा परिषद' ही स्वस्त घरांची योजना समर्थपणे राबवली, तीही १०० टक्के मराठी माणसांची, यात "बेस्ट'चेही कर्मचारी आहेत; जे सेनेच्या युनियनमध्ये होते. याउलट मनोहर जोशींचा मुलगा, जावई बिल्डर होऊन दादरमधल्या चाळी विकत घेत सुटले आणि टॉवर बांधत सुटले! ४१२ कोटी रुपये भरून कोहिनूर मिलची जागा विकत घेणाऱ्या उन्मेष जोशी- राज ठाकरे यांना "नागरी निवारा' धर्तीवर, मराठी माणसांसाठी घरं बांधता येत नाहीत? पण असा विचार करून, तो प्रत्यक्षात आणणाऱ्यांना "समाजवादी' म्हणून हिणवण्याखेरीज ठाकरे कुटुंबीयांना येते काय?
महापालिकेत सेनेची सत्ता असताना, मागच्या २६ जुलैला वांद्य्रापासूनची पुढची मुंबई पाण्याखाली गेली होती, तेव्हा हिंदू, मुस्लिम, मराठी, अमराठी हे भेद विसरून मुंबईकर पहाटेपर्यंत हाताला हात धरून धीर देत होता आणि ठाकरे कुटुंब सुरक्षित नौकेतून, पंचतारांकित हॉटेलात जाऊन निवांत झोपलं! ही यांची मुंबईकर, मराठी माणसांसाठी आस्था!
सेना सत्तेत असताना, झुणका-भाकर केंद्रांचे वाटप झाले. त्यातली किती निष्ठावान सैनिकांना मिळाली? आज ती कोणाच्या ताब्यात आहेत? सेनेच्या काळात भरभराट झाली मराठी माणसांची; पण ती मराठी माणसे म्हणजे ठाकरे कुटुंब, त्यांचे काही नेते, आमदार, नगरसेवक! बाकी "वडापाव'च्या गाडीवरच राहिले!
सेनेने काय केलं मराठी माणसांसाठी मुंबईत? घरं दिली? मराठी नाट्य परिषदेचं नाट्यगृहही शेवटी कॉंग्रेसवाल्यांनी तडीस नेलं! कामगारांसाठी काही केलं? उलट सेंटॉर हॉटेलच्या विक्रीत संशयास्पद भूमिका निभावली. आज "रिलायन्स एनर्जी'वर मोर्चे नेणाऱ्या सेना-मनसेला माहीत नाही का की हा "रिलायन्स'चा राक्षस "रालोआ' काळात प्रमोद महाजनांनीच सवलतींचा पाऊस पाडत उभा केला? पाकिस्तानबरोबर क्रिकेट नको म्हणणारे ठाकरे, वाघा बॉर्डरवर जाऊन वाजपेयींनी सोडलेली बस का नव्हते थांबवू शकले?
थोडक्यात- उद्धवचा लाखाचा मासा, राज ठाकरेंनी सीकेपी मसाल्यात तळून खाल्ला काय किंवा राजची महागडी गाडी (अर्थात परदेशी बनावटीची) उद्धवने फोडली काय, आम्ही कशासाठी दुःखी-कष्टी व्हायचे? आम्ही १०० टक्के मराठी असून हे विचारतोय, आहे उत्तर कुणाकडे?