श्री. नरेंद्र,

बौद्ध धर्मीय प्रार्थनेचा संदर्भ आपण येथे दिला आहे. माझ्या चिंतनातून मला पटलेला अर्थ मी देतो आहे. मी बौद्ध धर्माचा अभ्यासक नाही. मी त्यांचे तत्त्वज्ञान वाचलेही नाही. तरीही हे धाडस करतो आहे.

संघशक्तीचे निःसंदिग्ध वर्चस्व त्यांमध्ये विशद केलेले आहे. ते प्रार्थनेचे शब्द आहेत:

बुद्धं शरणं गच्छामि । म्हणजे बुद्धिवंतास मी शरण जातो,

आपण जे म्हणता "बुद्धीला पटेल तसे आपण वागतो. ही बुद्धीशरणता होय."

          हे मला पटत नाही. कारण बुद्धी निर्णय घेते. पण तेथे अधिष्ठान कशाचे असावे हे महत्त्वाचे आहे. देहबुद्धीचे अधिष्ठान असेल तर स्वार्थांध होऊन समाजहित लक्षात न घेताच बुद्धी निर्णय घेईल आणि तद्वत आचार करण्यास भाग पाडेल. पण बुद्धांसारख्या धर्मगुरुंना हे अभिप्रेत नसावे. येथे अधिष्ठान आहे ते आत्मबुद्धीचे.

              माझ्या मते "बुद्ध" म्हणजे  "ज्ञानी". किंवा ज्याला बोध झाला आहे असा अर्थ असावा. गौतम बुद्धांना असे म्हणावयाचे असावे की जे ज्ञानी आहेत - माझ्या आधी ज्यांना ज्ञान प्राप्त झाले ते किंवा माझ्यानंतरही ज्यांना ज्ञान प्राप्त होईल ते. येथे ज्ञानी म्हणजे "आत्मज्ञानी" असे अपेक्षित असावे. अशा आत्मज्ञानी अधिकाऱ्यांस शरण जातो. शरण जाणे म्हणजे त्यांचे अनुकरण करणे अथवा त्यांच्या मार्गाने जाणे.

असाच अधिकारी धर्माचरण करू शकतो. म्हणूनच ते

धम्मं शरणं गच्छामि । म्हणजे धर्मास मी शरण जातो,

असे म्हणू शकतात. ज्यांच्या ठायी आत्मज्ञान आहे असेच साधक अखिल विश्वाच्या सुखाचा-शांतीचा विचार करू शकतात, आचार करू शकतात. रामदास स्वामींनी "धर्म" म्हणजे "समाजाची धारणा करतो तो" असा अर्थ दिला आहे. परस्परावलंबित्व स्वीकारून परस्पर उपयोगी जीवनक्रम जगणे आणि समाजहित साधणे म्हणजे धर्माचरण अशी माझी धारणा आहे. म्हणून मी धर्मास शरण जाणे पसंत करतो.

संघं शरणं गच्छामि ॥ संघास मी शरण जातो.
(धर्म = अर्धमागधी भाषेत धम्म, बुद्धवचने संस्कृत/अर्धमागधीत लिहिलेली दिसून येतात.)

क्रम महत्त्वाचा आहे. संघशरणता सर्वोच्च महत्त्वाची मानलेली आहे.

          माझ्यामते क्रम महत्त्वाचा आहेच. पण मला वाटते "संघं" पेक्षा ही आधी "बुद्धं" महत्त्वाचा आहे. येथे संघं म्हणजे धर्माचरण करणाऱ्या साधकांचा समूह अपेक्षित असावे. नुसता मानवी समूह नव्हे.

        काल एका आयुर्वेदाचार्याशी बोलताना पंचीकरण शास्त्राचा विषय निघाला.आयुर्वेदही "आत्मतत्त्व" आपल्या विचारप्रक्रियेत प्रथम स्थानी धरते. पृथ्वी,आप,तेज,वायू आणि आकाश ह्या पंचमहाभूतांचा पसारा भासतो त्याचे अधिष्ठान हाती आले की कोडे सुटते. मन कसे तयार होते त्याचाही विचार होणे गरजेचे आहे. पण येथे तो देणे विषयास धरून होणार नाही.

माझे मानणे असे आहे की साऱ्या अवनतीकारक रोगांचे मूळ मनोविघटनाद्वारे शारीरिक दुर्बलतेत घडून व्यक्तीस ऱ्हासाप्रत नेत असल्याचे ज्ञान ह्या वचनांमागच्या भूमिकेमधून स्पष्टपणे दिसून येते.

म्हणूनच तर तुकाराम महाराजांसारख्या संतांनीही उपदेश केला की, "मन करा रे प्रसन्न । सर्व सिध्दींचे कारण"
"शुद्ध परमार्थ"
म्हणजे नेमके हेच. मग तुकाराम महाराज म्हणतात "आनंदाचे डोही । आनंद तरंग ॥ गाऊ परमानंद मनासंगे"

मला म्हणूनच असे वाटते की आत्मज्ञानाशिवाय माणूस सुखी होऊच शकणार नाही. आताचे मानवी प्रयत्न हे " आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी" असेच आहेत. आपण ऱ्हासाबद्दल बोलता आहात. पण उत्त्पत्ती,स्थिती आणि लय हा प्रपंचाचा स्थायी भाव आहे. विघटने कसे व्हावे हे आपण कोण ठरवणार? सुखाच्या शोधात आपणच गैरवापर करू लागतो आणि दु:ख निर्माण करतो असे नाही वाटत?