पुस्तके विकत घेण्याची कारणे अनेक असू शकतात. खरोखर वाचनाची आत्यंतिक आवड, पाहिजे तेंव्हा हवा तो संदर्भ न मिळाल्याने येणारी अस्वस्थता टाळण्याचा उपाय, स्वतःची मानसिक गरज किंवा अगदी स्वतःच्या अभिरुचीचे प्रदर्शन यातील काहीही.
आपल्याजवळ हवेच असे वाटणारे पुस्तक असेल तर त्याला किंमतीचे बंधन वाटत नाही. एरवीही मध्यमवर्गीय माणसाला एकही पुस्तक विकत घेणे परवडत नाही, हे पटण्यासारखे नाही. चांगल्या हॉटेलात जेवण घ्यायचे म्हटले की फटकन शंभर रुपये जातात. चांगला शर्ट चार-पाचशे रुपयाच्या खाली मिळत नाही. नाटक सिनेमाच्या तिकिटांची किंमत साठ, ऐंशी, शंभर रुपयांपर्यंत असते. या न्यायाने मराठी मध्यमवर्गीय माणसाला महिन्या-दोन महिन्यातून एकही पुस्तक विकत घेणे परवडत नाही, हे पटत नाही. 'पुस्तक विकत घ्यावे, इतकी मला वाचनाची आवडच नाही' हे सांगण्यात कमीपणा वाटत असला ( तसा तो वाटण्याचे काही कारण नाही ) की मग किंमत हे कारण पुढे केले जाते. अर्थात आवडणारे प्रत्येक पुस्तक विकत घेण्याची ऐपत असलेले फारच थोडे, हेही खरेच.
'हात राखून न ठेवता आम्ही करतो ती एकमेव खरेदी म्हणजे पुस्तके' असे सुनीताबाई देशपांड्यांनी म्हटले होते. पुस्तकांच्या प्रदर्शनात लोकांची गर्दी दिसते, लोक अजूनही आवर्जून पुस्तके विकत घेतात, हे आशादायक आहे, असे मला वाटते. मी स्वतः गेली कित्येक वर्षे नियमितपणे पुस्तके विकत घेत आलेलो आहे, याचा मला अभिमान वाटतो.