तात्या म्हणतात ते अगदी खरे आहे. कुठलेहि सामान फुकट दिले जात नाही. पण ग्राहकांना आकर्षित करण्याचे हे सर्व प्रकार असतात. एकदा गिऱ्हाईक दुकानात शिरला की जाहिरातीतल्या सवलतीच्या वस्तू घेऊन इतरहि जास्त वस्तू घेऊन जातो असा त्यांचा (योग्य) अडाखा असतो.
माझ्या एका मित्राचे विजेचे वेगवेगळे दिवे विकायचे दुकान ऍटलांटामध्ये होते. काही दिवसांनी ते त्याने बंद करण्याचे ठरवले. तेव्हा त्याने "गोइंग आउट ऑफ बिझिनेस" असा सेल लावला. त्यात सर्व वस्तूंच्या किमती आधी जास्त रकमेच्या चिठ्ठ्या लावून त्यावर काट मारून त्या निम्म्या किमतीत विकल्या. अशा रितीने त्याने सर्व माल चटकन संपविला.
इथे गाड्या विक्रीकरता फारच करामती करतात. साधारण शनिवार हा गाडी विक्रीचा महत्त्वाचा दिवस असतो. त्यादिवशी सर्व वर्तमानपत्रात मोठ्या जाहिरातींचा वेगळा पुरवणी अंकच असतो. त्या आठवड्याच्या गुरुवारी एक chaser जाहिरात असते. त्यात एखाद्या गाडीची खरोखर अगदी कमी किंमत दिली असते. समजा टोयोटा कॅमरीची किंमत $२५,००० डॉ. आहे. त्या गुरुवारी एका गाडीचे प्रकाशचित्र देऊन त्याची किंमत $२२,००० डॉ मोठ्या अक्षरात दाखवतात. खाली अगदी बारिक अक्षरात त्या गाडीचा ओळख क्रमांक देतात(VIN). तुम्ही जर शुक्रवारी/शनिवारी गेलात तर ती गाडी शिल्लक नसते. पण जाहिरात गिऱ्हाईक खेचण्याचे काम चोख करते. अशी किमतीत सूट त्या दुकानाच्या विक्रीच्या करता बाजूला ठेवलेल्या बजेट मधून दिली जाते.
माझे (भारतात असताना) मारवाडी, सिंधी आणि गुजराथी असे व्यवसायदार खूप मित्र होते. ते म्हणत की कोठलाहि व्यापारी घाट्यात धंदा करत नाही. जेव्हा ते घाट्यात गेला असे म्हणतात तेव्हा "फायदेमे घाटा" असाच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असतो.
इथे (अमेरिकेत) नोव्हेंबरच्या चवथ्या गुरुवारी Thanksgiving हा मोठा सण असतो. त्याच्या दुसऱ्या दिवशी (नाताळासाठी) खरेदीचा मोठा दिवस समजतात. त्यादिवशीची खरेदी हा वेगळा लेखाचा विषय होईल. या दिवशी प्रत्येक दुकानाच्या प्रचंड जाहिराती येतात. त्यात कुठल्या वस्तू विशेष सवलतीच्या आहेत याचे रसभरित वर्णन असते. बहुतेक वस्तूंवर पहिल्यांदा पैसे भरा मग तुमच्या पावत्या आणि त्या वस्तूच्या UPC कापून पाठवून ती सवलतीची रक्कम परत मिळवा असा मोठा द्राविडी प्राणायाम असतो. त्यांच्या (दुकानदारांच्या) अंदाजाप्रमाणे फक्त २५% गिऱ्हाईक सर्व सोपस्कार करतात. त्यात प्रत्यक्ष सवलतीचे पैसे परत मिळणारे भाग्यवान जेमतेम १०% असतात.
तेव्हा जरी ही फुकट डील्स सहसा नसली तरी पण अशा वस्तू विकत घेण्यात ग्राहकाला मोठा पराक्रम वाटतो आणि दुकानदार चांगला धंदा झाला म्हणून खूष असतो. असा हा दुहेरी आनंदाचा (win-win) प्रकार असतो.
कलोअ,
सुभाष