तो म्हणजे पुस्तकांची खरेदी करताना अनेक निकषावर पुस्तकांची खरेदी होत असते. हाच निकष कपडे खरेदी करताना अथवा शुधाशांतीगृहात जाताना आपण करत नसतो.
पुस्तके घेताना ती मला अथवा माझ्या कुटुंबियांपैकी कोणाला कितपत आवडतात हा निकष सर्वात जास्त महत्त्वाचा असतो. प्रदर्शनातील पुस्तके बघताना/चाळताना/वाचताना वेळ कसा भुर्रकन् उडून जातो ते कळतदेखील नाही पण तेच कपडे खरेदी करताना किंवा क्षुधाशांतीगृहात आहे म्हटलं की घड्याळाचे काटे सरकता सरकत नाहीत. अशा ठिकाणी जास्त वेळ घालवायला मला अजिबात आवडत नाही. कधी एकदाची पटकन निवड करून दुकानातून बाहेर पडेन असं होतं.
आपला ज्या पुस्तकातील रस संपला आहे अश्या पुस्तकांची विल्हेवाट कशी लावावी?
शाळेची पुस्तके शाळेतल्या मुलांना दिली होती. कॉलेजची भविष्यात न लागतील अशी पुस्तके ( जी सेकंड हँडच घेतलेली असायची ) अर्ध्या किंमतीत विकून नव्या वर्षाची पुस्तके ( अर्थात सेकंड हँडच ) विकत घेतली. भविष्यातही उपयोगी पडतील अशी अथवा आवडीच्या विषयांची पुस्तके ( ही मात्र कोरी करकरीत एकदम फर्स्ट हँड ! ) आजही आमच्या लायब्ररीत दिमाखात हजर आहेत. आता एकेक कोर्स करतेय तसतशी या संग्रहात भरच पडत आहे.
पुण्यात असताना आर्थिक ओढाताणीचा अत्यंत वाईट अनुभव मला आला होता तेव्हा बाबांकडून पैसे मागायचे नाहीत या हट्टाला पेटून मी माझी अत्यंत लाडकी पुस्तके मिळतील तितक्या पैशात विकून वेळ मारून नेली होती. आज ती पुस्तके मी परत विकत घेतली असली तरी भरपूर आठवणींनी नटलेल्या अशा ज्या माझ्या प्रती होत्या त्या मी कायमच्या गमावल्या याचं शल्य आयुष्यभर माझ्यासोबत राहील.
घेतलेल्या पुस्तकातला रस संपलाय असं माझ्याबद्दल तरी कधी झालंच नाही, उलट दरवेळेस एखादं पुस्तक वाचायला घ्यावं तर आधीच्या वाचनांमध्ये लक्षात न आलेले असे नविनच पैलू लक्षात येत जातात. विसंचा कांचनमृग आजवर जितक्यांदा वाचला तितके नवनविन पैलू लक्षात येत गेले आणि आयुष्यावर किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार होऊ शकतो याचे धडे मिळत गेले.. अजूनही मिळतात आणि मिळत राहतीलही. तीच गत मृत्युंजयची.. तीच माझी जन्मठेपची.. पुस्तकातला रस संपेल आणि त्यांची विल्हेवाट लावावी लागेल?! नोऽऽ वेऽऽऽऽ ( हा 'वे' म्हणजे रस्तादेखील आणि 'वेदश्री'ला दिलेली साददेखील ! )
जागेची अडचण लक्षात घेता यावरही विचार व्हावा असे सुचवावेसे वाटते.
पुस्तकांबद्दलची वेगवेगळी आवड जोपासणाऱ्या आमच्या घरात 'जागा' हा प्रश्न खरंच गंभीर आहे. स्वतःला राहायला जागा उरली नाही तरी बेहत्तर पण पुस्तकांना जागा असायला हवी असा प्रत्येकाचा बाणा असतो. :-) पुस्तकांसाठी एक जंगी खोली सजवण्याचाच विचार आहे. बघुया आईबाबांच्या लग्नाच्या वाढदिवसापर्यंत जमतंय का करायला ते..
पुस्तक विकत घेताना अजून कोणत्या निकषावर पुस्तकाची खरेदी होत असते
निरनिराळ्या वयोगटातील कुटुंबसदस्य असलेल्या आमच्या घरात त्या-त्या सदस्यांची गरज, कार्यक्षेत्रे, आवडीनिवडी यावर आधारीत पुस्तकखरेदी होते. दुसऱ्या सदस्याची आवड ही माझी नावड असू शकते पण पुस्तक घरात आलं की हटकून वाचन होतेच. कधीकधी नावडीची धार बोथट होऊन आवडीची किनार लागायचं काम झालं आहे त्यामुळे मला या प्रकारची पुस्तकखरेदी जबरदस्त आवडते. विज्ञानकथा वाचायला मला आवडत नाही असं म्हणणारे बाबा जेव्हा एका रात्रीत क्रोमोझोम-६ वाचून संपवून दुसऱ्या दिवशी माझ्याशी वाद घालायला सिद्ध झाले होते, तेव्हा इत्तका आनंद झाला होता सांगू ! मग त्यांनी इन्व्हेस्टमेंटवरची पुस्तकं वाचायला सांगितल्यावर ती मी वाचून काढली... अर्थातच एका रात्रीत नाही कारण ती पुस्तकं डोळ्यासमोर धरली की झोप यायची मला ! :D
आता घरापासून दूर रहात असल्याने माझ्या कार्यक्षेत्राशी निगडीत पुस्तकांखेरीज मी आता एकटीच जाऊन माझ्या आवडीनुसार आणि घरच्यांच्या फर्माईशीनुसारदेखील पुस्तके विकत घेते. पुस्तके घ्यायची म्हणजे फक्त मराठीच असा माझा पुर्वीचा खाक्या आता बराच बदलला आहे आणि इतर भाषेतल्या पुस्तकांनादेखील आनंदाने जागा मिळायला लागली आहे. विकत घेतल्यावर जरी ती माझ्याकडे असली तरी घरी गेल्यावर तिथेच ठेवली जात असल्याने घरातल्यांनाही वाचावीच लागतात ! इतर कोणी नाही तरी बाबा नक्कीच वाचून काढतात सगळी पुस्तकं. :-)
पुस्तकांची किंमत हा तसा नाजूक विषय असला तरी पुस्तकखरेदीबद्दल निर्णय घेण्यासाठी कळीचा ठरण्याइतपत महत्त्वाचा नाही. किंमत न बघता हवे ते पुस्तक घेता यावे म्हणून इतर गोष्टींवरील खर्चामध्ये काटछाट करायला कोणीच कधीच मागेपुढे बघितले नाही. बक्षिसाचे पैसे, ओवालणीचे पैसे अशाही स्त्रोतांमधून पैशाची आवक व्हायची. वर्षातून एकच सिनेमा, एकदाच बाहेर फिरायला जाणे, क्वचितच बाहेर जेवायला जाणे वगैरे गोष्टी अगदी आनंदाने अंगवळणी पडल्या. अशाप्रकारे साठवलेल्या पैशातून घेतलेली पुस्तके आज किती आनंद देत आहेत आणि आठवणींनाही स्वतःमध्ये जपून आहेत ! अगदी जोडाक्षरविरहीत गोष्टींपासून ते आत्मचरीत्रांपर्यंत, रुचिराच्या सर्व भागांपासून ते क्रोशा- दोन सुयांच्या पुस्तकांपर्यंत.. गणेशपुराण, दासबोधापासून ते नाते मनामनाचे पर्यंत.. काय नाही आता माझ्या घरच्या चुटुकल्या लायब्ररीत !
पुस्तकांचे आदानप्रदान व्हावे काय?
आदानाबद्दल - मी इतरांकडची पुस्तके वाचते पण घरी आणून नाही.
प्रदानाबद्दल - पुस्तकांची निगा राखण्याबाबत माझ्याप्रमाणे ( खरंतर माझ्याहून सरस ) सवयी असलेल्या माझ्या जवळच्या नातेवाईकांमध्ये - हो. बाकीच्यांकडे - नाही. चेटकिणीचा जीव जसा पोपटात असतो म्हणतात तसा माझा जीव माझ्या डायरीपुस्तकात असतो, जो मी असाच कोणाला देऊ शकत नाही.. देत नाही !
जवळच्या ग्रंथालयात पुस्तक मिळते काय?
ग्रंथालयात जाऊन तिथल्या खडूस आणि वेळखाऊ कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालण्यासाठी वेळ नाही. जेव्हा बघावं तेव्हा लायब्ररी लावण्याचेच काम चालू असते !
भेटीसाठी आपण पुस्तकांचा विचार करतो काय?
घरातल्यांना भेटी द्यायच्यात म्हटलं की पुस्तकांचाच विचार अंमलात आणला जातो, बाहेरच्यांबद्दल मात्र त्या-त्या व्यक्तीच्या मला ज्ञात त्यांच्या आवडीनिवडीनुसार इतर गोष्टींचादेखील विचार केला जातो.