'तो' या पुल्लिंगी सर्वनामाचे अनेकवचन 'ते' असे होत असून, 'तो आंबा' याचे अनेकवचन 'ते आंबे' असे होते. नपुंसकलिंगात 'ते' हे एकवचनी सर्वनाम असल्याने, 'पुल्लिंगी' शब्दांचे अनेकवचन 'नपुंसकलिंगी' होते तसेच 'नपुंसकलिंगी' एकवचनाचे अनेकवचन स्त्रीलिंगी होते असे बऱ्याच जणांचे समज असल्याचे आढळून येते यावर तज्ज्ञांनी प्रकाश टाकावा.

आम्ही शिकलेल्या व्याकरणाप्रमाणे पुल्लिंगी 'तो' चे अनेकवचन 'ते' व नपुसकलिंगी एकवचन 'ते' यांतील फरक कळावा म्हणून नपुसकलिंगी एकवचन असलेल्या 'ते'वर (अनुच्चारित) अनुस्वार द्यायची पद्धत होती. त्याचप्रमाणे स्त्रीलिंगी एकवचन 'ती' व नपुसकलिंगी अनेकवचन 'ती' यांच्यांत गल्लत होऊ नये म्हणून नपुसकलिंगी अनेकवचन 'ती'वर (अनुच्चारित) अनुस्वार दिला जात असे. आता अनुच्चारित अनुस्वारांची हकालपट्टी झाल्यामुळे असा गोंधळ होणे अपरिहार्य आहे. मराठी मुलांना इंग्रजींतील सर्वनामे शिकवतांना हा गोंधळ अडचण निर्माण करतो.