जी भाषा देशात रोजच्या व्यवहाराची भाषा म्हणून वापरली जाते, शिकवली जाते तिचा स्थानिक भाषेवर प्रभाव पडणे क्रमप्राप्तच आहे.
जर एखाद्या अशिक्षित माणसासमोर डॉक्टर, 'सिजेरिअन' हा शब्द वापरत असतील तर त्याने त्याचे काय भाषांतर करावे असे अपेक्षित आहे? त्याला त्या शब्दाचा अर्थ कळला तरी खूप.
'सिजेरिअन' शब्दाची व्युत्पत्ती *जुलिअस सीज़रच्या जन्मावरून झाली असे सांगण्यात येते. (चू. भू. दे. घे) तेव्हा अशा प्रकारच्या शब्दाचे मराठीकरण काय करणार? अशिक्षितच का बरीचशी सुशिक्षित माणसेही त्याचा नेमका अर्थ माहित नसतानाच तो वापरतात.
तसेही बऱ्याचशा शब्दांचे शब्दशः भाषांतर केल्याने ते हास्यास्पद वाटतात. त्यातूनही प्रतिशब्द बनवणे म्हणजे बोजड संस्कृत शब्द घुसवणे असे बरेचदा होते, आणि तेही जनसामान्यांनी डोळे झाकून आपलेसे करावे असा अट्टाहास धरला जातो.
फक्त बोली भाषेतून मराठी शब्द वापरणे इतकीच या विषयाची व्याप्ती नसावी. यासाठी शिक्षण-उच्च शिक्षण, कामकाज सर्वच त्या भाषेतून झाले तरच स्वकीय शब्द तोंडात रुळण्याची सवय होईल. अर्थात, भारतासारख्या देशात इतक्या भाषा असताना प्रत्येक राज्यातील माणसे फक्त त्यांची मातृभाषाच बोलू-लिहू-वापरू लागली तर बहारच येईल. ;-) तेव्हा अट्टहासाने मराठी बोलण्यात फारसा अर्थ नाही, ज्या नव्या संज्ञा परकीय भाषेतून दाखल झाल्या आहेत त्या स्वीकारण्यास हरकत नसावी. मला व्यक्तिशः 'भ्रमणध्वनी' म्हणण्यापेक्षा 'मोबाईल' किंवा 'सेल फोन' म्हणणेच आवडते.
परंतु याच बरोबर नेहमीच्या वापरातल्या प्रचलित मराठी शब्दांनाही हळूहळू चाट मिळतो आहे असे दिसते. तेव्हा मात्र खेद वाटतो, जसे सर्रास पलंगाऐवजी बेड म्हणणे, स्वयंपाकघरा ऐवजी किचन म्हणणे, बैठकीच्या खोली ऐवजी हॉल, लिविंग रूम म्हणणे असे अनेक शब्द विनाकारण* वापरले जातात.
* जरी ही आख्यायिका असली तरीही हा शब्द प्राचीन रोमन कायद्यांच्या द्वारेच इंग्रजीत रूढ झाला आहे.
**विनाकारण की सुटसुटीत वाटतात म्हणून? हा वेगळा मुद्दा होऊ शकतो.