'सिजेरिअन' शब्दाची व्युत्पत्ती *जुलिअस सीज़रच्या जन्मावरून झाली असे सांगण्यात येते. (चू. भू. दे. घे) तेव्हा अशा प्रकारच्या शब्दाचे मराठीकरण काय करणार? अशिक्षितच का बरीचशी सुशिक्षित माणसेही त्याचा नेमका अर्थ माहित नसतानाच तो वापरतात.

खरं आहे. किंबहुना या शब्दाचा नेमका अर्थ / मूळ माहीत नसल्यामुळे बऱ्याचदा या शब्दाची विचित्र रूपं तीच रूपं बरोबर असल्याच्या थाटात ऐकायला मिळतात. बहुधा याचा Caesarपेक्षा scissorsशी अधिक संबंध असल्याच्या गैरसमजुतीतून (एका अर्थी खरं आहे म्हणा ते!) ही रूपं निर्माण होत असावीत. "अमकीतमकीचं 'सिझर' झालं" पासून "'सिझर इन' झालं" (scissor in????) पर्यंत शब्दप्रयोग ऐकलेले/वाचलेले आहेत.

नशीब seizuresना मराठीत 'फेफरं', 'फीट येणं' वगैरे शब्दप्रयोग अगोदरच रूढ आहेत म्हणून, नाहीतर Caesarian आणि seizuresचाही छान गोंधळ झाला असता.

तेव्हा अट्टहासाने मराठी बोलण्यात फारसा अर्थ नाही, ज्या नव्या संज्ञा परकीय भाषेतून दाखल झाल्या आहेत त्या स्वीकारण्यास हरकत नसावी. मला व्यक्तिशः 'भ्रमणध्वनी' म्हणण्यापेक्षा 'मोबाईल' किंवा 'सेल फोन' म्हणणेच आवडते.

जोपर्यंत 'मोबाईल' किंवा 'सेलफोन' हे शब्द मराठीतूनच उद्भवल्याच्या थाटात वापरले जाऊ शकतात, तोपर्यंत ते बदलण्याचं काहीच कारण दिसत नाही.

परंतु याच बरोबर नेहमीच्या वापरातल्या प्रचलित मराठी शब्दांनाही हळूहळू चाट मिळतो आहे असे दिसते. तेव्हा मात्र खेद वाटतो, जसे सर्रास पलंगाऐवजी बेड म्हणणे, स्वयंपाकघरा ऐवजी किचन म्हणणे, बैठकीच्या खोली ऐवजी हॉल, लिविंग रूम म्हणणे असे अनेक शब्द विनाकारण* वापरले जातात.

हळूहळू मिळते आहे कशाला, कधीच चाट मिळाली आहे. पलंग, लेखणी, दिवाणखाना, बैठकीची खोली, न्हाणीघर वगैरे शब्द बोलीभाषेत (लेखीत/पुस्तकांत/वाङ्मयात नव्हे - ती भाषा बदलायला वेळ लागू शकतो. आणि एका दृष्टीनं लेखी भाषा ही काहीशी अश्मीभूत [fossilized] असल्यामुळे प्रचलित भाषेचं प्रतिनिधित्व करू शकत नाही.) मागच्या वेळेला नेमके कधी ऐकलेत? मला तरी ऐकल्याचं आठवत नाही.

कॉट, बेड, पेन, हॉल, झालंच तर सायकल वगैरे हे शब्द बोलीभाषेत आपलेच असल्याच्या थाटात इतके रुळल्यावर त्यांना आपले मानण्यात आणि त्यामुळे इतर शब्दांना चाट मिळण्यात खेद वाटण्यासारखं काहीच वाटत नाही. शब्द काय, येतात आणि जातात. आणि चाट मिळालेल्या शब्दांपैकीही काही शब्द इतर भाषांतून आले असतीलच की. 'दिवाणखाना'ऐवजी 'हॉल', 'पाव'ऐवजी 'ब्रेड', 'मेज'ऐवजी 'टेबल', 'दवाखाना'ऐवजी 'क्लिनिक' यात नेमकं काय बिघडलं? यातले चाट दिलेले शब्दही बाहेरून येऊन आपले झाले होते, आता त्यांऐवजी इतर बाहेरचे शब्द आपले होताहेत, यात वाईट वाटण्यासारखं काय आहे? फारतर 'जुन्यानव्याचा वाद' म्हणता येईल.

- टग्या.