पैसे अन्य ठिकाणी वाचवा पण पुस्तके स्वतः विकत घ्या. अहो मराठी लेखक/प्रकाशकाला गिऱ्हाइक नाही मिळाले तर तो लिहिणार/छापणार कसा आणी का? आणी मग आपणच बोंबा मारणार मराठी साहित्याची विल्हेवाट लागल्याबद्दल?! लेको, साहित्य नुसते चर्चा करून आणी अधिवेशने भरवून वाढत नसते. उपाशी पोटी जसे सैन्य चालत नाही तसेच उपाशी लेखणी कोणत्या दिशेला भरकटेल हेही सांगता येत नाही.
मी पैज लावायला तयार आहे कि येथे लिहिणाऱ्यांपैकी एकाचीही आर्थिक परिस्थिती अशी नाही की त्याला महिन्या-दोन महिन्यात शंभर-दोन्शे रुपये पुस्तकांवर खर्च करता येणार नाही.
पुस्तकांची 'विल्हेवाट' लावणेही सोपे आहे. नको असलेले पुस्तक एखाद्या ग्रंथालयाला देउन टाका. ते अगदी नक्की घेतील आणी ज्यांना *खरेच* परवडत नाही अश्या व्यक्ती तुम्हाला दुवा देतील.
ग्रंथालयाने अगदी नाहीच घेतली पुस्तके (तुमच्या संग्रहातील काही पुस्तके जास्तच 'खट्याळ' आहेत म्हणून किंवा इतर कारणास्तव) तर सरळ रद्दीत देउन टाका. पण 'नंतर काय करू' म्हणून आत्ता विकत घेण्याचे टाळू नका.
माझ्या स्वतःकडे अशी ५० तरी मराठी पुस्तके (व शेकडो इतर) स्वतः विकत घेतलेली आहेत जी मी विद्यार्थी-दशेत ग्रंथालयातून, मित्रांकडून आणून वाचलेली होती. त्यातील अनेक लेखक/पुस्तकांनी माझी विचारसरणी (आणी विचार करण्याची ताकद) घडवली/वाढवली. आज मी स्वतः मिळवतो. इश्वर-कृपेने माझ्या चैनीखातरही थोडे पैसे उधळू शकतो. ती पुस्तके मी पुन्हा कधी वाचेन असे वाटत नाही पण ज्यांच्या लेखणीनी मला घडवले त्या लेखकांना थोडी कृतज्ञता दाखवण्यास त्यांची पुस्तके विकत घेतो. हा माझा मोठेपणा नव्हे तर 'बोले तैसा चाले' असल्याची ग्वाही आहे.
असो.
क. लो. अ.
अ. ना.