अरूण साधूंच्या लेखाचा दूवा दिल्याबद्दल धन्यवाद! लेख आवडला. साधूंचे लिखाण नेहेमीप्रमाणेच विचार करायला लावणारे वाटले! फक्त त्यांचा या लेखात जरा "पर्याय नाही" हा जो सूर आहे तो जरा खटकला.
मराठी भाषा वृद्धींगत होण्यासाठी खोट्या सीमारेषा ठेवू नयेत हे वर बऱ्याचजणांनी म्हंटल्याप्रमाणे मान्य आहे. मराठी भाषेच्या अनेक बोलीभाषा आजही अस्तित्वात आहेत. कोकणी तर दर दहा मैलांवर बदलते असे म्हणतात, तशीच "मिंग्लीश" असली तर हरकत कशासाठी? पण म्हणून आपलाही फ़ॉर्मल (शब्द?)"शब्दकोष" असणे गरजेचे आहे.
मराठी भाषा साधू म्हणतात तशी बदलली आहे, आणि ते चांगलेही आहे. पण त्यांनी हे ही ओळखायला हवे की आजही "सुश्लोक वामनाचा, अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची, किंवा आर्या मयूर पंतांची ॥" वाचत असताना आपल्याला ती जेव्हढे शेक्सपियरचे इंग्रजी आजच्या इंग्रजांना कळायला अवघड जात असेल तेव्हढी अवघड वाटत नाही.
साधू चायनीज लोकांबद्दल बोलले की ते आता इंग्रजी शिकायला लागलेत. पण याच बरोबर त्यांनी हे ही लक्षात ठेवायला हवे की अमेरिकेत आता असा"ट्रेंड" येत आहे की कॉलेज मधे मुले चायनीज शिकत आहेत. (मधे या विषयावर नॅशनल पब्लीक रेडीओवर कार्यक्रम झाला होता).
अमेरिकेततर बऱ्याच ठिकाणी आणि फोनवर स्पॅनीश बोलले जाते. सरकारी कचेऱ्यातपण आणि बऱ्याचदा फ़ॉर्म्स पण त्या भाषेत असतात. मी ज्या शहरात राहतो तिथेतर "स्पॅनीश, पोर्तुगीज (ब्राझिलीयन्समुळे), हेशियन (हैटीची)" या भाषांमधे व्यवस्था करून ठेवली आहे. स्पॅनीश तर आता अमेरीकेत "राजकीय" बळ झाले आहे. म्हणूनच बूश स्पॅनीशमधे बोलायला शिकलाय!
थोडक्यात इंग्रजी ही "जागतीक" म्हणताना मराठीला "आगतीक" करायची गरज नाही. फुकाचा अभिमान अथवा वृथा मराठी मराठी करू नये हे मान्य पण म्हणून भाषेची मिसळ करायची गरज नाही, किंवा लाज वाटायची गरज नाही. प्रश्न आहे तो कमी लेखणारी वृत्ती बदलण्याचा. एका इच्छाशक्तीने "बाँबे"चे "मुंबई" केले. आज मी जगभरची प्रसिद्धी माध्यमांपासून ते "बॉलीवूड"पर्यंत सर्वच मुंबई या शब्दाचा वापर करताना पाहतो, पण आपले मराठी भाषीक मात्र "बाँबे"च म्हणतात तेंव्हा खेद वाटतो.
म्हणूनच साधूंना सांगावेसे वाटते की आपण नवीन शब्दांचे स्वागत नक्कीच करू, पण जागतीक होण्यासाठी जर मराठी-इच्छाशक्ती दुर्बळ असली तर नवीन शब्द नुसतच "उसनं अवसान" ठरतील!