ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांबद्दल मी केलेले विधान हे माझ्या घराच्या परीसरातील लायब्ररीतील कर्मचाऱ्यांसंदर्भात होते. सरसकट सर्व लायब्ररीतले कर्मचारी असे असतात असं माझं म्हणणं नाही.
आमच्या घराशेजारीच असलेली मनपाची लायब्ररी भरपूर मोठी आणि मराठी पुस्तके जास्त असली तरीही इतरही भाषांची पुस्तके विपुल प्रमाणात असलेली अशी आहे. लायब्ररीच्या वेळा एकतर माझ्या शाळा-कॉलेज अथवा ऑफीसच्या वेळेलाच असायच्या आणि त्यातूनही वेळ काढून मी पुस्तक घ्यायला जाता तिथले कर्मचारी अतिशय जीवावर आल्याप्रमाणे काम करायचे. कुठल्याही भाषेत बोलून त्यांना काही फरकच पडायचा नाही. "मॅडम, तुम्ही म्हणताहात ते पुस्तक आहे आमच्याकडे, पण ते आत्ता नक्की कुठे आहे ते नाही सांगू शकणार !!! लायब्ररी लावायचं काम चालू आहे. आणखीन दोन आठवड्यांनी येऊन बघा. नक्की देतो काढून पुस्तक." दोन काय चार आठवड्यांनी काय.. आजही जाऊन बघाल तर त्यांची लायब्ररी लावून झालेली नसेल !
आक्का ( माझी मोठी बहिण ) मात्र जायची आणि दोन तास घालवून एखादं पुस्तक घेऊन यायची. ऑफीसच्या कामाची तिला आवड नसल्याने लायब्ररीसाठी इतका वेळ देणं तिला शक्य होतं.. वर्कींग डेला असा वेळ काढणं मला शक्य नव्हतं आणि आजही नाही.
इथे मात्र माझ्या रूमच्या जवळच्या भागात एक धमाल लायब्ररी सापडली आहे मला. रोज चालू असते ही लायब्ररी - सकाळी ८ पासून रात्री ११ पर्यंत ! पैसे देऊन पुस्तक वाचायला घेऊन जायचं, वाचलं आणि आवडलं तर आपल्याचकडे राहू द्यायचं नसता वाचण्याचे पैसे ( १० ते ३० रुपये ) ठेवून घेऊन आपले बाकीचे पैसे आपल्याला परत ! वाचायला कितीही दिवस लागले तरी चालतं त्यांना. अगदी मी माझ्या घरी घेऊन जाऊन घरच्या सर्वांनी वाचून झाल्यावर परत आणून दिलं तरी चालतं त्यांना ! बऱ्याच जणांनी वाचलेली पुस्तके असली तरी बऱ्याच चांगल्या स्थितीत असतात तिथली पुस्तकं आणि किंमतही बऱ्यापैकी आपण ठरवू शकतो किती द्यायची ते ! आजवर मी कुठलंच पुस्तक परत केलं नाही त्यांना. तिथे काम करणारी माणसंदेखील खूप चांगली आहेत. आपण मागू तेव्हा त्यांना एखादं पुस्तक सापडत नसलं तर ते सांगतील त्या दिवशी गेल्यास हमखास ते पुस्तक मिळतेच मिळते. माझी आवड त्यांना बऱ्यापैकी कळलेली असल्याने ते माझ्यासाठी पुस्तके बाजुलादेखील काढून ठेवतात आणि हे पुस्तक तुम्ही न्याच असं म्हणून त्याकरता तगादा लागतात. पहिल्यांदा जरा नाखुशीने आणलं असं एक पुस्तक वाचायला पण आता अगदी डोळे झाकून त्यांनी कुठले पुस्तक सांगितल्यास घेऊन येते. इंग्लिश अजिबात न येणाऱ्या त्या माणसांना अगदी झकास पुस्तके कशी काय सुचवता येतात हे मला न उलगडलेलं कोडं आहे. हे मी त्यांना असं विचारता त्यांचं उत्तर होतं,"ताई, बालपणापासून याच कामात आहोत. इंग्लिश पुस्तक वाचायला नाही शिकलो पण पुस्तक घेऊन जाणारांना वाचायला शिकलोय इतक्या दिवसात. बस्स.. " ! ते मराठी आहेत हे कळता मी त्यांच्याशी मराठीत बोलायला सुरूवात केल्यावर त्यांना खूप आनंद झाला होता. आता मला माझ्या आवडीची भरपूर इंग्लिश पुस्तकं वाचायला मिळत आहेत. :-)