उशीर झाला पण तुमच्या वरील प्रतिसादातून तुमचा रोख अश्या पालकांकडे आहे असे वाटते की जे आपापल्या मुलांना त्यांची आवड आणि महत्त्वाकांक्षा (कळत नकळत) दाबून टाकून लग्नाच्या चाकोरीतून जायला भाग पाडतात किंवा तसे करणेच बरोबर असे मुलांच्या मनावर ठसवतात - त्यांचे निर्णय स्वातंत्र्य मान्य करीत नाहीत. असे म्हणायचे असल्यास तुमचे बरोबर वाटते - ही गोष्ट सुधारलीच पाहिजे. व्यक्तीला निर्णय स्वातंत्र्य असणे हे महत्त्वाचे आहे - ते आपल्या समाजात कमी आढळत असल्याने आपण रुजवणे अश्या अर्थाने पाश्चात्यीकरण म्हणायचे असले तर ते ठीक वाटते. पण लग्नावर भर न दिल्यास समाजावर त्याचे काय परिणाम होतील ह्याचाही विचार करायला हवा. पाश्चात्य देशातही लग्नावर तुम्ही म्हणता तसा भर नाही, पण मग त्यासाठी लग्नपूर्व मैत्रीचा पर्याय आहे.
अश्या मैत्रीत भविष्यकाळात केवळ लग्नच नाही पण स्थिरताही हवीच असते - नाही का? आपल्याकडे लग्नामुळे येणाऱ्या स्थिरतेचे जास्त स्तोम माजले आहे आणि ते कमी व्हावे असे म्हणू शकतो - पण तरी मानसिक स्थिरता प्राप्त करायला लग्न हा समाजमान्य पर्याय आहेच आणि आईवडिलांच्या नजरेतून पाहिले तर मुलांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा सुखरूप (त्यांच्या हयातीत) पार पडावा असे त्यांना वाटल्यास काही चूक नाही - - त्यात आईवडिलांची मुलात झालेली गुंतवणूक दिसते. शिवाय बऱ्याचदा मुलांनाही तेच हवे असते. तसेच काही अपवादात्मक उदाहरणे वगळल्यास बहुसंख्य मुलामुलींच्या स्वतःच्या संसाराबद्दल सर्वसामान्य अपेक्षा असतात हे मान्य होऊ शकेल असे वाटते. याला सामाजिक भर म्हणा किंवा सोशल बिहेविअरल पॅटर्न.. तसा वेगळा पॅटर्न पाश्चात्य देशातही असतोच नाही का? त्या पॅटर्नचेही बरे वाईट परिणाम त्या समाजावर होतच असताना दिसतात. पण म्हणून ते दुसऱ्या समाजाच्या पद्धती सरसकट स्विकारताना दिसत नाहीत.
शिवाय असा कुठचा विदा उपलब्ध आहे की ज्यामुळे या पद्धतीच्या पाश्चात्यीकरणाला विरोध करायचे काहीच कारणच उरत नाही?
सुहासिनी