माझ्यामते हा लेख वैचारिक नसून मनोरंजक आहे. मनोरंजनापुरतीच त्या लेखाला किंमत दिली पाहिजे.

दीडशे वर्षे इंग्रजांनी राज्य करूनही आणि त्यानंतर उच्चशिक्षण इंग्रजी माध्यमात असूनही जर इतकेच इंग्रजी शब्द मराठीत (किंवा इतर कोणत्याही भारतीय भाषेत) आले असतील तर हे या भाषांच्या जिवंतपणाचे लक्षण आहे. वसाहतवादामुळे बऱ्याच देशांनी आपली मूळ भाषा सोडून राज्यकर्त्यांची भाषा स्वीकारलेली आहे.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या/संगणकीकरणाच्या लाटेपुढे इतर भाषा टिकणार नाहीत अशी भीती असताना स्वभाषीकरण (लोकलायझेशन/इंटरनॅशनलायझेशन) सारख्या उपक्रमांमुळे त्यावरही उपाय निघाला आहे. नवे शब्द सुरुवातीला बोजड/कृत्रिम वाटतीलही पण कालांतराने रूढ होतील.

शिवाय इंग्रजीची एवढी टिमकी वाजवायची आवश्यकता नाही. संगणकक्षेत्रात सुरू असलेल्या प्रगतीचे उदाहरण लेखात आले आहे. आतापर्यंतचे भारतीय कंपन्यांचे यश इंग्रजीच्या ज्ञानामुळे मिळाले हे खरेच पण यापुढे व्यवसाय वाढवण्यासाठी इतर जागतिक भाषांचे ज्ञान आवश्यक झाले आहे. जर्मनी, फ्रान्स, जपान इथले प्रकल्प मिळवायचे असतील तर जर्मन, फ्रेंच, जपानी भाषा येणे अनिवार्य असते. त्यामुळे आजकाल जर्मन/फ्रेंच/जपानी भाषा शिकण्याकडे कल वाढला आहे. उत्तर अमेरिका, युरोप, आशिया यानंतर दक्षिण अमेरिकेत असणाऱ्या असंख्य संधींकडे भारतीय संगणक कंपन्यांचे लक्ष आता वळले आहे. पण तिथे स्पॅनिश/पोर्तुगीज येत नसेल तर व्यवसाय करणे अशक्य आहे. त्यामुळे त्या भाषा शिकणे किंवा तिथल्याच लोकांना कामावर घेणे हेच पर्याय त्यांच्यासमोर आहेत.

ज्यांना फक्त इंग्रजीच येते त्यांना असणाऱ्या संधी कमी झाल्याने इतर भाषा शिकण्याची लाट आल्यास आश्चर्य नाही. किंबहुना त्याची सुरुवात झालेलीच आहे.