इथे आम्ही दोन पद्धतींनी ६ जणांत ३०४ खेळतो.
पद्धत पहिली, पत्त्यांचे दोन जोड:
पत्त्यांच्या दोन्ही जोडांतील एक्का ते नव्वी पाने घ्यायची. प्रत्येक जोडातील २४ अशी एकूण ४८ पाने. बोली ३०० पासून सुरू. एकूण गुण ६०८! जोडीदार निवडताना एक पान सांगायचे. उदा. बदाम गोटू. तर ज्या _दोन_ लोकांकडे बदाम गोटू असेल ते आणि बोली जिंकणारी असे तिघे भागीदार होतात. उरलेल्या तिघांचा दुसरा संघ. आता पुढे, हात करणे, राजाराणीच्या जोड्या दाखवणे वगैरे प्रकार नेहमीप्रमाणे. गुण मोजताना तिघांना एकेक असे. समजा एकाच माणसाकडे दोन्ही बदाम गोटू आले तर २ वि ४ असा खेळ. दोघांचा तो संघ जिंकला तर दोन गोटू वाल्याला दोन लाल ठिपके, बोली लावणाऱ्याला एकच!
पद्धत दुसरी, पत्त्यांचा एक जोड:
एक्का ते नव्वी पाने काढायची. एकूण पाने २४. पहिल्या वाटणीत प्रत्येकाला दोन दोन पाने जोडून द्यायची. म्हणजे वाटताना एकेक न वाटता दोन दोन. भागीदार पक्के ठरलेले. एका आड एक बसलेले. पिशी घड्याळाच्या उलट्या दिशेने फिरणारी. पिसणाऱ्याच्या उजवीकडच्याने किमान २०० बोलायलाच हवेत. (३०४ पैकी २००) पुढचे लोक बोली वाढवू शकतात. ज्याची बोली सगळ्यात मोठी त्याने हुकुमाचे पान खाली लपवायचे. त्याच्या उजवीकडचा माणूस खेळायला सुरुवात करणार. पहिल्या पानाची उतारी झाल्या झाल्या हुकूम काय आहे ते उघडून बघायचे. ज्याने हुकूम लपवला त्याला शेवटी खेळायची संधी मिळते. बोलीइतकी पूंजी जमली तर संघाला १ लाल ठिपका. तीन हात केल्यावर शेवटचे पान खेळताना जर आपला हात होईल अशी खात्री असेल तर तसे जाहीर करून उतारी करायची. जर झाले, तर दोन लाल ठिपके. खेळाची सुरुवात करतानाच जर चारही हात होतील असे जाहीर केले तर ३ लाल ठिपके. पण अश्या वेळी चारही हात होतील असे जाहीर करणारीने उतारी करून सुरुवात करायची. ज्या पानाची उतारी करून सुरू करू तो हुकूम. शिवाय चारी हात स्वबळावर करायचे. एखाद्यावेळी भागीदाराचे पान वरचढ ठरले तरी 'चार' बुडतात. कोणतीही बोली बुडली तर जितके लाल मिळाले असते त्यापेक्षा एक काळा ठिपका जास्त. म्हणजे साध्या २००च्या बोलीला बुडल्यावर २ काळे, शेवटच्या पानावरच्या चाराला बुडल्यावर ३ काळे आणि सुरुवातीला बोललेल्या चाराला ४ काळे. २००ची बोली करून १०० ते २००च्या दरम्यान गुण जमले तर अर्धे काम केल्याचा एक काळा कमी. म्हणजे एकच काळा.
इथे आम्ही दर शनिवारी पत्ते खेळतो! पोकर, रमी, चॅलेंज, जजमेंट, ३०४ वगैरे वगैरे. :-)