पेटंट म्हणजे आपला शोध इतर कुणी आपल्या परवानगीशिवाय वापरू नये यासाठी कायद्याने केलेली तरतूद. एखादी गोष्ट 'पेटंटेबल' होण्यासाठी ती गोष्ट नवीन म्हणजे नॉव्हेल, उघड नसलेली म्हणजे नॉन ऑबव्हिअस, उपयुक्त आणि जिचे वर्णन करून सांगता येईल म्हणजे 'एनेबलमेंट' या परिमाणात बसणारी असावी लागते. पेटंट हे भौगोलिक सीमा असणारे असते. म्हणजे समजा एखाद्या गोष्टीचे एखाद्याने भारतात पेटंट घेतले असेल, तर त्याला ती गोष्ट अमेरिकेत तयार करून विकण्यासाठी अमेरिकन पेटंट घ्यावे लागेल. एखादे उत्पादन किंवा ते तयार करण्याची प्रक्रिया यासाठी पेटंट घेता येते.
कॉपीराईट हा बहुदा 'इंट्लेक्चुअल प्रॉपर्टी' या सदरात बसणाऱ्या गोष्टींसाठी असतो. उदा. कथा, कादंबरी, चित्र यासाठी. यातील मजकूर किंवा भाग मूळ लेखकाच्या/ चित्रकाराच्या  परवानगीशिवाय वापरता येत नाही. कॉपीराईट बहुदा पन्नास वर्षांसाठी असतो. त्यानंतर त्या कलाकृतीवरचा त्या कलाकाराचा हक्क संपुष्टात येतो.
भारतात पेटंटसाठी 'इंडीयन पेटंट ऍक्ट १९७०' हा कायदा आहे. इतर देशांत त्या त्या देशांचे कायदे आहेत. पेटंटसाठी पेटंटिंग ऑथॉरिटीकडे विहित नमुन्यात अर्ज करावा लागतो. अशा अर्जांचे नमुने माहितीजालावर उपलब्ध आहेत.