आता अनुताईंनी हे सगळं सांगून पाणी-पुरी करणं पण सोप्पं केलंच आहे. पण तरी, हा माझा अनुभव -

पाणीपुरी चं पाणी करताना गोड व तिखट पाणी वेगवेगळे करावे. म्हणजे प्रत्येकाला आवडीप्रमाणे पाणी करून घेता येईल.

गोड पाणी :-- चिंच तासभर (जास्त) पाण्यात भिजवून ठेवावी. त्यातच गूळ आणि साखर सुद्धा घालावी. मग ती चांगली उकळवून घ्यावी. गार करून मिक्सर मधून फ़िरवून घ्यावी; म्हणजे चिंचेचा सगळा कोळ नीट निघेल. आता हे मिश्रण पातळ फडक्यातून किंवा गाळण्याने गाळून घ्यावे.  हे पाणी शेपुबद साठी जसे दाट बनवतो तसे बनवायचे नाही, म्हणूनच चिंच भिजवतनाच ती जास्त पाण्यात भिजवायची आहे.

तिखट पाणी :-- यासाठी पुदिना, हिरव्या मिरच्या, आले सर्व मिक्सर मधून काढून घ्यावे. त्यातच पाणी घालून नीट मिसळून घ्यावे. त्यात चवीप्रमाणे शेंदेलोण - पादेलोण घालावे.

गोड व तिखट पाणी (लगेच पाणी-पुरी वर ताव मारायचा मोह टाळून - अवघड आहे. पण तरीही. अगदी मोह झालाच तर १-२ चवीखातर पहाव्यात.) कमीत कमी अर्धा तास तरी फ्रीझ मध्ये गार करण्यासाठी ठेवावे. आणि मगच त्या गारेगार पाण्याची अनोखी चव कळेल.

अगदीच पिवळे वाटाणे किंवा हिरवे मूग भिजवून शिजवून घ्यायला वेळ नाही मिळाला तर खारी किंवा तिखट बुंदी वापरावी. तसेच बाकी शिजवलेला बटाटा, बारीक शेव आवडीप्रमाणे वापरता येईलच.

टीप:--- पाणीपुरी साठी पाणी करताना त्यात चिंच, गूळ व साखर समप्रमाणात वापरावी. तसेच भेळेसाठी पाणी करताना त्यात खजूर व चिंच समप्रमाणात वापरावे आणि साखर घालू नये.

चु.भू.द्या.घ्या.