मिलिंद, माझ्या आठवणींच्या राज्यातला हुकुमी पत्ता असलेले हे गाणे इथे उपलब्ध करून दिल्याबद्दल धन्यवाद.
इंजिनिअरींगच्या प्रवेशप्रक्रियेत मी आणि बाबा माझ्या नावाचा पुकारा होतो की नाही.. होईल तर तो कधी वगैरेबद्दलची वाट बघत इतर पाल्यपालकांबरोबर युनिव्हर्सिटीच्या त्या प्रतीक्षागृहात बसलेलो होतो. माझ्या शेजारी बसलेल्या पायलचे बाबा आणि माझे बाबा यांचं आपापसांत प्रवेशप्रक्रियेबद्दल बोलणं चालू होतं. मला जाम टेन्शन आलं होतं सगळ्याच एकंदर प्रक्रियेचं. प्रवेश नाही मिळाला फ्री सीटमध्ये तर काय, हाही भुंगा डोकं पोखरत होताच. पण.. हे काय? अचानक त्या गूढ गजबजाटाने भारलेल्या वातावरणात मस्तमधुर सूर दरवळले आणि मराठी भावगीतांचे बोल कानी पडायला लागले ! टेन्शनपासून सुटका मिळावी हेतूने मी ती गाणी जीवाचे कान करून मनभरून ऐकायला सुरूवात केली. डोळे मिटून गाणी ऐकताना त्यांत मी कधी रंगून गेले माझं मलाच कळलं नाही. टेन्शनपासून कोसो दूर अशा माझ्या लाडक्या जगात मी जाऊन पोहोचले होते. गाण्यांच्या एकामागून एक बरसणाऱ्या त्या मनाला चिंब भिजवून टाकणाऱ्या सरींमध्ये 'जीवलगा, कधी रे येशील तू' गाण्याची सर ओसरायला आणि माझं नाव पुकारलं जायला एकच गाठ पडली. मला बोलवलं गेलं आहे, याबद्दल बाबांनी मला जाणीव करून देता कुठे माझी तंद्री भंगली आणि एकदम कळी खुलावी तशा आनंदीत चेहऱ्याने मी प्रवेशासाठी आवश्यक सगळी कागदपत्रं घेऊन गेले. जबरदस्त ओढाताणीचा तो दिवस एकूणातच किती संस्मरणीय करून टाकला होता त्या गोड, भावविभोर गाण्यांनी माझ्यासाठी ! सिंपली मार्व्हलस !