जमीन आवडली. सानी मिसऱ्यांची कल्पना विशेष. सुटे-सुटे मिसरे मस्त  आहेत. जसे फुलाने फुले वेचणे सोड आता, दिव्याने दिवे लावणे सोड आता! किंवा खुळ्याशी खुळे बोलणे सोड आता!!!पण कुठे-कुठे दोन ओळींत  संबंध नीट प्रस्थापित झालेले नाहीत असे वाटते.

सखे बोल ना, लाजणे सोड आता

मनाने मने वाचणे सोड आता!
हा मतला स्पष्ट होत नाही. मनाने एकच मन वाचणे सोडायला हवे होते. सखी प्रियकराचे सोडून इतरही मने वाचत असल्यास हरकत नाही.

नको आर्तशी आळवू भैरवीला

तड्याने तडे जोडणे सोड आता!
ह्यात वरच्या ओळीशी तड्यांचा संबंध स्पष्ट होत नाही. भैरवी म्हणजे अंत असे समजले तरी.

तुझ्या पायवाटेवरी टाकलेली
फुलाने फुले वेचणे सोड आता!
हा शेर छान. आहे. वरची ओळ बदलल्यास अधिक चांगला होऊ शकतो.

तुझ्या पायवाटेत प्राजक्त, चाफा

फुलांनी फुले वेचणे सोड आता
असे काहीसे किंवा

फुले पायवाटेत सांभाळ बाई

फुलांनी फुले वेचणे सोड आता
असे काहीसे.


दिवे दोन जैसे तुझे नेत्र राणी
दिव्याने दिवे लावणे सोड आता!
वरची ओळ बदलायला हवी.

उघडझाप झाली पुरे पापण्यांची

दिव्याने दिवे लावणे सोड आता!
असे काहीसे.

खुळा मी, खुळी तू, खुळे प्रेम... वेडे...
खुळ्याशी खुळे बोलणे सोड आता!!!
ह्या शेरात खुळ्याशी खुळे बोलण का सोडावे हे कळत नाही, स्पष्ट नाही. म्हणून -

खुळा मी, खुळी तू कितीदा म्हणावे?

खुळ्याशी खुळे बोलणे सोड आता!!!
अशी सुचवणी द्यावीशी वाटते.