मंडळी,
आज परत या विषयाला प्रतिसाद देतो आहे. आमच्या पुण्यातल्या कचेरीत काही गोष्टी अशा घडत आहेत ज्यामुळे जरा संभ्रमित आहे.

१. आज माझी आणि अर्थात कचेरीतील सर्व अभियंत्यांची 'एच. आर. च्या संदर्भासाठी आहे' असे सांगून एका 'कामाच्या स्वरुपाचे वर्णन' नावाच्या वरकरणी तरी निरुपद्रवी दिसणाऱ्या कागदावर सहि घेतली गेली. सामान्यत: २ पानी कागदपत्र असेल तर सही शेवटच्या म्हणजे दुसऱ्या पानावर घेतली जाते. पण इथे ती पहिल्या पानावर घेतली गेली ज्यावर फक्त त्या पदाचे नाव आहे. (म्हणजे नंतर गरज पडली तर कचेरी दुसरा कागद बदलेल का?)
२. ज्या कामाच्या वर्णनावर मी सही केली त्यासाठी मला घेतले गेले होते, पण त्या कामाशी संबंधित प्रशिक्षण मला जर्मनीत मिळाले नाही. (ज्या प्रशिक्षणासाठी माझ्याकडून कचेरीत नियुक्त होण्या आधी चार वर्षे/सहा लाखाचा करार लिहून घेतला होता.) मी त्यांना सांगितले की या कागदावर मी सही करणे मला पटत नाही, कारण यातले एकही काम मी गेल्या अडिच वर्षात केलेले नाही. पण त्यानी नेहमीची व्यवस्थापन वल्गना केली की तुम्हाला कागदोपत्री या कामावर घेतले होते, आणि पुढे तशी परिस्थिती आल्यावर तुम्हाला तेच काम देण्याचा प्रयत्न करु. सही केली कारण विचारासाठी वेळ मागितल्यास मुख्य व्यवस्थापक आरडाओरडा करुन मानसिक दबाव आणतो. (याचा कचेरीला कायदेशीर उपयोग कर्मचाऱ्याविरुद्ध करता येईल का? म्हणजे एखादया माणसाने करार तोडल्यास त्याच्याविरुद्ध पुरावा म्हणून या कागदाचा कितपत उपयोग होईल?)
३. कचेरीच्या 'एच. आर. पॉलिसी' कर्मचारी करारात असताना अर्ध्यात बदलल्या तर त्याविरुद्ध काही कामगार कायदा आहे का? कारण 'एच आर. पॉलिसी' हा प्रकार काही नियम असे आणू शकतो हे करारात असताना नव्हते आणि कर्मचाऱ्याला जाचक आहेत. मुळात 'एच. आर. पॉलिसी' काय असाव्यात यासंबंधी काही कायदा आहे का? किंवा प्रत्येक एच. आर. च्या माणसाला पॉलिसी बनवताना पाळलेच पाहिजेत असे काही कायदे अस्तित्वात आहेत का?
४. कर्मचाऱ्याची कुठल्याही कागदपत्रावर सही घेताना त्याच्यावर मानसिक दबाव आणला गेला आणि विचार कालावधी नाकारला गेला तर त्यापासून रक्षण करायला काही कायदे आहेत का?
५. हे सर्व माहिती म्हणून विचारले आहे. आणि मनोगतावर माहितगार माणसे असल्यास काहीतरी माहिती मिळावी अशी अपेक्षा आहे. (वकिलाची सल्ला फी वाचवणे इ. कंजूस हेतू अजिबात नाही, तटस्थ,खरा आणि हिताचा सल्ला हवा आहे म्हणून आंतरजालाची मदत घेतली आहे.)

आपला
(कचाट्यात सापडलेला) परदेशी