पं. यशवंत देव यांचा सत्तरावा वाढदिवस एका सार्वजनिक समारंभात थाटाने साजरा झाला होता त्याला उपस्थित राहण्याची संधी मला मिळाली होती. रंगमंचावर व.पु.काळे, दारव्हेकर मास्तर, अरुण दाते यासारखी दिग्गज मंडळी बसलेली होती. यशवंत देवांच्या यशस्वी वाटचालीतील आठवणींची उजळणी करतांना "स्वर आले दुरुनी" या गीताचा प्रामुख्याने उल्लेख केला गेला. त्या वेळी ते नागपूर नभोवाणी केन्द्रावर कार्यरत होते. त्यांचे स्नेही प्रभाकर जोग यांनी एक स्वरलिपि रचून त्यांना पत्राद्वारे कळवली व त्यावर देव सरांनी चपखल शब्दरचना करून एक अविस्मरणीय गीत निर्माण केले.