चिकू,
चिकटपट्टीसहित प्रकाशचित्र पाहिले. काळजी घे. फार लागलं असं वाटत नाही ते बरंच म्हणायचं.
असो.
सार्वजानिक ठिकाणी पडणे - धडपडणे ही एक मजेशीर गोष्ट असते, म्हणजे ती त्याक्षणी आपल्या स्वतःसाठी मजेशीर नसली तर जगासाठी मजेशीरच असते हे ध्यानात घेऊन ती मजेत घेणेच फायद्याचे असते. यावरून एक अनुभव आठवला.
फारा वर्षांपूर्वी जेव्हा मी सीप्झमध्ये नोकरीला होते तेव्हा एकदा अंधेरी स्टेशनाजवळ संध्याकाळी आमची कार्यालयाची बस नेहमीप्रमाणे आम्हाला थांब्यावर उतरवून निघून गेली. तिथून अंधेरी पूर्वेचा स्टेशनाबाहेरचा रस्ता ओलांडला की पुढे ट्रेन पकडायची आणि नवा प्रवास सुरू करायचा असा नित्यनियम होता.
अंधेरी पूर्वेचा स्टेशनाबाहेरचा रस्ता ओलांडणे हे महादिव्य. बराच वेळ रस्ता ओलांडायला मिळाला नाही तरी एक बस समोरून येत असताना ती थोडी हळू येते आहे की काय असा ग्रह झाल्याने आपण रस्ता ओलांडून जाऊ अशी बुद्धी मला झाली. दुर्दैवाने अशीच बुद्धी समोरच उभ्या असलेल्या रस्त्याच्या पलिकडल्या एका गृहस्थांनाही झाली, आणि येणाऱ्या बसकडे पाहत रस्ता ओलांडायच्या नादात आमची टाळकी एकमेकांना धडामदिशी आदळली.
ही टक्कर इतकी जबरी होती की बरेच क्षण आपल्या टाळक्यासभोवती काजवे नाही तर अनेक ट्विटी बर्डस् पिंगा घालत आहेत अशी माझी आणि त्या गृहस्थांची स्थिती होऊन आम्ही होतो त्या ठिकाणी स्थिर झालो. तो पर्यंत बशीने ;-) येऊन आमच्यासमोर करकचून ब्रेक मारले आणि चालकाने आपल्या तोंडाचा ऍक्सिलेरेटर जोरात दाबला हे सांगणे न लगे.
माझ्या ऑफिसचे काही सहकारी सोबत असल्याने त्यांनी ओढून मला बाजूला खेचले आणि त्या गृहस्थांनाही इतरांनीच बाजूला केले. :D