माझा शुचिपेक्षा माझ्या स्वतःच्या शुद्धलेखनावर अधिक विश्वास आहे.
ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे.
शुचि वापरण्याची गरज वाटत नाही. त्यातून बऱ्याच वेळा माझे बरोबर लिहिलेले शब्द शुचि चुकीचे दाखवतो असे दिसल्याने शुचि वापरण्यात वेळ घालवत नाही.
ही दुःखाची गोष्ट आहे. ह्याचे कारण शु.चि. जेव्हा कार्यरत झाला तेव्हा त्यात अत्यंत मर्यादित गोष्टी होत्या. थोडक्यात शुद्धलेखनाचे त्याचे ज्ञान शून्यवत होते. तो दिवसेंदिवस शिकत आहे. शुद्धलेखनाचे शून्य ज्ञान एकीकडे आणि शुद्धलेखनाचा आत्मविश्वास आणि खात्रीचे ज्ञान असणारे सदस्य एकीकडे ह्यात तो सध्या मध्ये कोठेतरी आहे. ज्यांची स्थिती त्याच्या मागची आहे त्यांना शु.चि. कडून पुष्कळ मदत होते. ज्यांची स्थिती शु.चि. च्या पुढची आहे, ते शु.चि. तल्या चुका वेळोवेळी दाखवून देतात. त्या पाहून शु.चि. त सुधारणा करून शब्दसंपत्तीत भर घालून त्याची कुवत वेळोवेळी वाढवण्यात येते. शु.चि. सुरू झाल्यापासून उत्पादन श्रेणीचा शु.चि. तयार व्हायला साधारणपणे दोन वर्षे लागतील असा अंदाज होता. दिनदर्शिकेप्रमाणे जवळ जवळ अठरा महिने झालेले असले तरी मध्यांतरीचे कमालीचे किचकट ऊर्ध्वश्रेणीकरण (जे आजपावेतो सर्वतः पूर्ण झालेले नाही), आराखड्यातील बदल इ. मुळे जेमतेम सात महिन्याचे अखंड काम शु.चि. वर झालेले आहे. अर्थात हे समर्थन नसून केवळ स्पष्टीकरण आहे.
ज्यांनी सुरवातीच्या काळात आणि अलीकडच्या काळात शु.चि. वापरलेला आहे त्यांना त्याची प्रगती/अधोगती नेमकी कळलेली असेल.
अलीकडेच शु.चि. तल्या चुका दाखवून देणे सोपे व्हावे म्हणून त्या सुविधेत किरकोळ बदल केलेले आहेत. आनंदाची आणि हुरूप वाढवणारी गोष्ट अशी की त्या नव्या बदलाबद्दल काहीही वाच्यता न करताही अनेकानेक सदस्यांनी बिनचुकपणे त्याचा वापर करून चुका निदर्शनास आणलेल्या आहेत. अर्थात हे यश केवळ त्या सदस्यांच्या शुद्धलेखन आणि शु.चि. विषयक कळकळीचे आहे ह्यात संशय नाही.
ज्यांना ज्यांना शुद्धलेखनाविषयी विश्वास आणि कळकळ आहे असे कोणीही सदस्य आपल्या फावल्या वेळात अशा प्रकारे चुका दाखवून देऊ शकतात. त्यासाठी स्वतःच लेखन केले पाहिजे असे नव्हे, तर मान्यवर वृत्तपत्रातले अग्रलेख (उदा. म.टा. किंवा सकाळ - जे युनिकोडमध्ये आहेत) ते येथे तेवढ्यापुरते नकलून त्याची शुद्धिचिकित्सा केली की अशा प्रकारे चुका दाखवून देता येतात. (हे केवळ माहितीसाठी लिहिलेले आहे. हा आग्रह, विनंती वा सुचवण नाही. आम्ही वेळोवेळी ह्या आणि इतर स्रोतांतील मजकुरांद्वारे हे करीतच आहो आणि करीतच राहू.)
शिवाय इतरत्र कोठे असा मराठी शुद्धिचिकित्सक सापडला तर त्याचा अभ्यास करून त्याचे चांगले गुण आत्मसात करण्याचेही सुरवातीपासून (खरेतर मनोगताच्या जन्माआधी सुमारे दोन वर्षांपासून) ठरवलेले आहे. अशी कोणाला काही माहिती असली तर सांगण्याचे आवाहनही इतरत्र केलेले आहे.