लेखनामध्ये अगदी ढोबळ स्वरूपाच्याही चुका जे वारंवार करतात अशांना मी शुद्धिचिकित्सक वापरा असे बरेचदा सांगते, मात्र मी स्वतः तो फारच कमीवेळा वापरते, कारण माझा स्वतःच्या शुद्धलेखनावर विश्वास आहे. अर्थात माझ्याही निष्काळजीपणामुळे वा घाई केल्याने अधेमधे चुका होतात, पण त्या क्वचित असतात. काही शब्दांच्या बाबतीत माझा गोंधळ असेल आणि असे शब्द माझ्या लेखनामध्ये असतील तर मी शु. चि. चा सल्ला घेते तो आणखी एक मत - सेकंड ओपिनिअन म्हणून.

मात्र प्रशासकांचा वरील प्रतिसाद वाचून एक शंका मनांत आली. शु. चि. नक्की कशाप्रकारे शिकतो ह्याची मला पूर्णपणे कल्पना नाही. मात्र कोणतेहीलेखन शु. चि. कडे तपासायला दिल्यास शु. चि. मध्ये मुळात नसलेल्या पण लेखनामध्ये असलेल्या शब्दांची भर शु. चि. मध्ये (आपोआप) पडते का? असे असेल तर मी माझे लेखन शु. चि. कडे तपासायला न देण्याने मी शु. चि. च्या शिक्षणाची एक संधी कमी करते का? हे खरेच असे असेल तर ह्यापुढे मी माझ्या लेखनावर माझा कितीही विश्वास असला तरी शु. चि. ला शिक्षणाची संधी देण्यासाठी म्हणून तरी माझे लेखन शु. चि. कडे तपासण्यासाठी जरूर पाठवत जाईन, आणि स्वतःच्या लेखनावर विश्वास असलेल्या इतरांनीही असे करावे अशी विनंती करेन.

शु. चि. योग्य शब्दही काहीवेळा चुकीचे दाखवतो, मात्र शु. चि. शिकतो आहे तसे हे प्रमाण कमी होत चालले आहे हे माझ्या शु. चि. च्या (कमी असलेल्या)वापरामधून(ही) मला जाणवले आहे. त्यामुळे असंख्य चुका, ढोबळ चुका करणाऱ्यांसाठी शु. चि. नक्कीच उपयोगी आहे ह्याबद्दल शंका नाही. शु. चि. डोळसपणे वापरला, इतरांचे शुद्धलेखन डोळसपणे वाचले, एकदा केलेली चूक पुढच्या वेळी टाळली तर शुद्धलेखन करणे फारसे अवघड नाही.