अशावेळी कुणाकडून अशुद्ध शब्दांची नोंद झाल्यास काय?

अशा नोंद झालेल्या शब्दांची डोळसपणे छाननी करूनच मग त्यांची भरती शब्दसंग्रहात केली जाते/जात नाही. (तरीही त्यात पुन्हा काही दोष राहिले तर पुन्हा केव्हातरी ते दिसतीलच. ...हे सर्व एक दोन महिन्यात आटपणारे काम नाही ह्याची आम्हाला जाणीव आहे.)

शुद्धिचिकित्सकाची शुद्धाशुद्धतेची कल्पना काय?

शु.चि. च्या शब्द संग्रहात जे शब्द आहेत, त्यांच्या विविध रूपांशी परीक्षणार्थी शब्दांची सांगड घालण्याचा प्रयत्न केला जातो. शब्द जसाच्या तसा जुळला तर तो निर्दोष आहे असे गृहीत धरले जाते आणि अधोरेखित होत नाही. अन्यथा अधोरेखित होतो. अशा सदोष(वाटलेल्या) शब्दांचे निदान भ्रष्ट रूपात एक वा अनेक शब्दांशी किंवा रूपांशी साम्य आढळले तर ते सर्व शब्द सुचवणी म्हणून माळले जातात. जे सदोष वाटतात पण सुचवणी सापडत नाहीत ते शब्द नवे म्हणून (वेगळ्या यादीत) संकलित होतात. असे संकलित शब्द आणि वापरत्याने नोंद ठेवलेले शब्द ह्या सर्वांची दखल यथाकाल सवडीने घेतली जाते. आणि आवश्यकतेनुसार त्यांची भरती मुख्य शब्दसंग्रहात केली जाते.