अंजू,
खूपच छान विषय चर्चेला घेतलास. जुन्या आठवणी आठवल्या की खरच खूप छान वाटते. आत्ता मला लगेच आठवलेल्या गोष्टी लिहिते.
पूर्वी एक 'चंचला' नावाची दात घासायची पावडर मिळायची. रंग गुलाबी आणि तपकीरी रंगाच्या कागदी पाकीटात मिळायची.
दुसरी म्हणजे मराठी बातम्या देणारी 'चारूशीला पटवर्धन' कृष्ण धवल रंगाच्या दूरदर्शन वर संध्याकाळी ७ ला बातम्या द्यायची. तिचे डोळे खूप छान आणि बोलके होते. खेळायच्या गोट्या असतात ना अगदी तसेच तिचे डोळे होते. आणि बातम्या संपत आल्यावर 'याचबरोबर आपल्या आजच्या बातम्या संपल्या, नमस्कार' शेवटचा नमस्कार म्हणताना ती खूपच गोड हसायची.
तिसरी म्हणजे पूर्वीच्या काही साड्या होत्या त्या अजूनही लक्षात आहेत. अमेरिकन जॉरजेट, एक नुसती जॉरजेट, एक बिन्नी. आईकडे एक पारदर्शक अमेरिकन जॉरजेट मरून रंगाची आहे. तिला ३५-४० वर्षे झाली आहेत, पण अजूनही अगदी जशीच्या तशी आहे.
रोहिणी