माझ्या लहानपणी दर शुक्रवारी लोकमत कॉमिक्स यायचे. हे तेव्हा लोकमत सोबत मोफत असायचे. आताही काही वर्तमान पत्रांसोबत कॉमिक्स येतं मात्र त्याला 'त्याची' सर नाही असं वाटतं. या लोकमत कॉमिक्स ने फॅन्टम पासून ते हेन्ऱी पर्यंत पात्र दाखवली. ढंप्या , सांडू , रोबो अमिताभ आणि त्याची साहसी कामगिरी, मुल्ला नसुरुद्दीन आदी.
सिंदबादच्या साहसी सफरी, गुलिव्हर, महाभारत, रामायण, शिवाजी महाराज, येशू, रविंद्रनाथ टागोर, तेनालीरामन ,अकबर बिरबल, इसाप आणि पंचतंत्र आदी सर्वांचे स्रोत म्हणजे हे जुने लोकमत कॉमिक्स होते.
मी बोलतोय तो काळ म्हणजे ८८ ते ९२ च्या दरम्यानचा आहे. या लोकमत कॉमिक्स मध्ये व्यंगचित्रकार म्हणून खलील खान काम करायचे. त्यांचा तो लांब आणि गोल नाक असलेला कुत्रा नेहमी प्रत्येक कथेत कुठेतरी असायचाच.
चांदोबा ने विक्रमवेताळ, तात्पर्यकथा, आणि जगातील कथांचे नजराणे दिलेत. ट्रॉयचा घोडा आदी. मला चांदोबातील महाभारत फार आवडायचे. एका पानावर उजव्या किंवा डाव्या बाजूला छोटं चित्र आणि मधातच संपूर्ण पान भर चित्र, हे चित्र पाहायला तेव्हा फार मज्जा यायची.
त्या नंतर हिंदी कॉमिक्स आवडायला लागले. चाचा चौधरी पासनं ते नागराज आणि सुपर कमांडो ध्रुव पर्यंत हे सगळे माझे मित्र होते.
नीलकांत