भविष्यकाळात काय घडणार आहे आधीच ठरलेले असेल तरच ते आधी सांगता येईल. कांही गोष्टी ठरविक काळानंतर निसर्गनियमानुसार होत असतात, उदा: पृथ्वीचे स्वतःभोवती फिरण्यामुळे होणारे दिवस्र व रात्र, वाढत्या वयामुळे येणारे बालपण, यौवन व वार्धक्य. या गोष्टींचे  अनुभवावरून भाकित करता येते. "नेमेचि येतो मग पावसाळा" असे एक ढोबळ विधान करता येते. पण एका विशिष्ट ठिकाणी विशिष्ट वेळी पाऊस पडतो तो त्या क्षणी तेथे असलेल्या परिस्थितीनुसार पडतो. ते आधीपासून ठरलेले नसते. उपग्रहावरून घेतलेले फोटो या क्षणी दिसणारे ढग दाखवतील. त्यावरून फार फार तर पुढील दोन तीन दिवसांचा थोडा अंदाज येऊ शकेल, नक्की केंव्हा आणि कुठे ते बरसतील हे सांगता येणार नाही. जी गोष्ट मुळात अस्तित्वातच नसते ती "आधुनिक विज्ञानाला तरी कुठे समजते?"  असे म्हणण्यात कांही अर्थ नाही.