अशुद्ध व संमिश्र भाषेच्या वाढत्या उपयोगाबद्दल लेखकाला वाटणारा उद्वेग व त्याला इतर मनोगतींनी दिलेले समर्थन मला पटते. पण हे सगळे हेतुपुरःसर जाणून बुजून होते आहे असे मला वाटत नाही. बोलतांना प्रत्येक जण पूर्ण विचार करून एक एक शब्द जुळवून बोलतो कां? जे आपल्या कानावर पडत असते, वाचण्यात येते त्यातून शब्द आतल्या आत जुळत जातात. कालांतराने नवे शब्द रूढ सुद्धा होतात. ही एक नैसर्गिक क्रिया आहे असे मला तरी वाटते. याच प्रक्रियेतून पुणेरी, नागपुरी, कोल्हापुरी बोली तयार होत गेल्या.  नवख्या माणसाला आधी त्या विचित्र वाटतात पण अंगवळणी पडल्यावर तो त्याच टोनमध्ये बोलू लागतो. टी.व्ही. चॅनेल्सवर ऐकू येणाऱ्या धेडगुजरी भाषांमुळे आपली भाषा भ्रष्ट होत असेल. पण मुळात तसली भाषा तयार कां होते? कुणी तरी चेंज म्हणून "अरे बाप, ये क्या हो रहेला है?" असली  भाषा एका टपोरी कॅरेक्टरच्या तोंडी घातली. आता तीच बोली जिकडे तिकडे पसरली आहे याला काय म्हणावे? एका हिट सिनेमामुळे गांधीवादाची गांधीगिरी होऊन गेली. अशी किती तरी उदाहरणे दाखवता येतील.

याला आळा घालता येईल कां?, कसा? व कां? या प्रश्नांची उत्तरे माझ्याकडेही नाहीत.