आपले काही चुकते आहे, असे या लोकांना वाटत नाही का?

नसावे. जर चुकते आहे असे वाटले असते तर लोक असे वागले नसते.

 की खरेच यात चुकीचे असे काही नाही?

हे तुम्हीच सांगा. तुम्हाला 'हॅप्पी दिवाली, डॅड!' म्हणणारी मुले खटकतात, ती का? असे म्हणण्यापेक्षा, 'दिवाळीच्या शुभेच्छा, बाबा!' असे म्हटलेले आवडले असते का? मी माझ्या लहानपणी आपल्या आईबाबांना अशा शुभेच्छा दिल्या नव्हत्या. पण हल्ली देते नि तेही देतात. हे चूक की बरोबर? आम्हाला असे काहीबाही (तसे निरर्थकच!) बोलून बरे वाटते म्हणून आम्ही बोलतो. नाहीतर केवळ मी, 'दिवाळीच्या शुभेच्छा', असे म्हटल्याने तुमची दिवाळी आनंदाची जाणार असते का?

ही शुभेच्छा देण्याची पद्धत मुळात परकीय. आयात केलेली. त्यामुळे मराठीत असे बोलणे थोडे अवघड, अतिशिष्ठ वाटू शकते. मी स्वतः हल्ली 'दिवाळीच्या शुभेच्छा' असे जाणीवपूर्वक मराठी बोलत असले तरी दोनेक वर्षांपूर्वीपर्यंत 'हॅप्पी दिवाली'च म्हणत होते. सुरुवात करताना मराठीत बोलणे संकोचाचे, अवघड वाटले होते. आता सवयीने विशेष काही वाटत नाही. मला स्वतःला जमेल तितके मराठी बोलायला आवडते. पर्याय असल्यास प्रादेशिक भाषेत बोलायला आवडते. म्हणून मी तसे करते. इंग्रजीत बोलताना 'यू शुड बी नोइंग' असली रचना ऐकली की वैताग येतो. पण इंग्रजीमिश्रित मराठी किंवा मराठीसंस्कारित इंग्रजी बोलणारे लोक चुकीचे वागताहेत का हे अजूनही मी ठरवू शकलेले नाही.