'मारे गये गुलफाम' च्या निमित्ताने बासुदांचे 'अनुभव' हे ( सकाळमध्ये आधी सदर म्हणून प्रसिद्ध झालेले आणि नंतर पुस्तकस्वरूपात आलेले अशोक राणेलिखित) अप्रतिम पुस्तक आठवले. 'तीसरी कसम' बाबतीतले त्यांनी लिहिलेले अनुभव मुळातूनच वाचले पाहिजेत.
बासू भट्टाचार्य हा एक 'अरभाट' माणूस होता. त्याच्याविषयी खरे तर एक वेगळा लेख लिहायला पाहिजे. रासवट हिरामणच्या भूमिकेसाठी राज कपूरला घ्यायला बासुदांचा तीव्र विरोध होता. शैलेंद्रकडून कथा कळाल्यावर आपणच हिरामणची भूमिका करणार यावर राजजी हटून बसले. राजजींचं शरीर मांसल, नरम आहे, शर्ट काढला तर ते बाई वाटतील, आणि त्यांचे निळे डोळे... त्याचं काय? बासुदांची यादी तयार होती. पण राजजी ऐकेनात. शेवटी एकदा पोटात तीन चार पेग गेल्यावर शैलेंद्रने राजजींना ही कारणं सांगितली. राजजींनी ताबडतोब बासुदांच्या घरी जाऊन थैमान घातले. दुसऱ्या दिवशी नशेत नसताना त्यांनी बासुदांना कारणं विचारली. बासुदांनी निराळाच सूर लावला. त्यांनी राजकपूरना सरळच सांगितलं ' आर.के. च्या बाहेरचा सिनेमा असला की तुम्ही मन लावून काम करत नाही, खरं की नाही सांगा...' राज कपूर पकडले गेले. बासुदा फार म्हणजे फारच स्पष्टवक्ते. ते पुढं म्हणाले 'तुमचा इगो फार मोठा आहे. मी दिग्दर्शक असताना हे चालणार नाही. सेटवर माझा शब्द अंतिम असेल, तुम्हाला चालेल का सांगा' राज कपूरनी सगळ्या अटी मान्य केल्या आणि बासुदांना जवळ घेऊन ते म्हणाले 'हट्टी बंगाली!'
राजजींचा स्त्रीलंपटपणाही त्या वेळी प्रसिद्ध होता. नायिकेच्या प्रेमात पडण्याचं त्यांना व्यसनच होतं. (सिमी गरेवालनं तर मुलाखतीत म्हटलं होतं,'राज कपूर कसला आमच्या प्रेमात पडतोय? उलट आम्हा नायिकांनाच आपण त्याच्या प्रेमात पडू नये म्हणून प्रयत्न करावे लागायचे!') राज कपूर नायक म्हटल्यावर कमाल अमरोहीनी मीनाकुमारीला हिराबाईची भूमिका करायला मज्जाव केला!
याच राज कपूरनी चित्रपटाची गरज म्हणून कधी नव्हे ते पहाटे पाच वाजता शूटिंगला हजेरी लावली होती. 'चलत मुसाफिर मोहलिया रे पिंजडेवाली मुनिया' गाण्यात हा त्यावेळचा यशाच्या शिखरावर असलेला अभिनेता गर्दीत बसून गायला होता. चित्रपट यशस्वी करायचा असेल तर चित्रपटाचा शेवट बदलून हिरामण- हिराबाई शेवटी एकत्र येतात असा करावा असा तद्दन रोख सल्लाही बासुदांना दिला होता. बासुदांनी तो अर्थातच मानला नाही!
आणि याच राज कपूरनी 'तीसरी कसम' आर.के. च्या चित्रपटांपेक्षा जास्त कलात्मक होतोय असं लक्षात आल्यावर हेवाबुद्धीने 'डेटस' न देऊन आठ-नऊ महिने तो रखडवला होता!
'तीसरी कसम' च्या सुरुवातीच्या अपयशानं खचून शैलेंद्रनं स्वत:ला दारूत बुडवून संपवून टाकलं, आणि काही दिवसांतच 'तीसरी कसम' ला राष्ट्रपती ऍवॉर्ड मिळालं. त्यानंतर तो चित्रपट चांगल्यापैकी चाललाही, पण हळव्या मनाचा शैलेंद्र हे पहायला जिवंत नव्हता!
'तीसरी कसम' च्या संदर्भातल्या अशा या सुरस आठवणी!
मला स्वतःला 'तीसरी कसम' अतिशय आवडतो. 'हम आपके लिये 'चाह' लेकर आते हैं' म्हणणारा, 'इस्स' म्हणून लाजणारा भाबडा राजकपूर, आयुष्याची अपरिहार्यता पचवावी लागलेली वहिदा रेहमान, सगळ्या जगावर, स्वतःवरच चिडून बैलांना मारण्यासाठी चाबूक उगारणारा हिरामण, 'मारो मत..'मागून येणारा हिराबाईचा आवाज.. छे, त्याच्या मनाचा खेळ! त्याच्या बैलगाडीच्या कमानीतून दिसणारी दूर निघून जाणारी आगगाडी, त्याचा गावंढळ आयुष्यात क्षणभर काही रंगीत स्वप्ने फेकून कायमची निघून गेलेली हिराबाई....!
या सगळ्या आठवणी ताज्या केल्याबद्दल आभार, दिगम्भा.