नमस्कार,

सर्वांत साधे असे तीन नियम सुरुवातीला (आगाऊपणे!) देत आहे. त्यांच्या वापराने काही सामान्यपणे होणार्‍या चुका टाळता येतील:

१) सर्व मराठी शब्द दीर्घांत आहेत. म्हणजे ई (इ नव्हे,) किंवा ऊ (उ नव्हे) या स्वरांनी संपणारे. ज़से की: दीर्घायू, (दीर्घायु नव्हे,) बुद्धी (बुद्धि नव्हे), ज़री, तरी (ज़रि, तरि नव्हे) इ.

अपवाद: नि, आणि, परंतु, तथापि ही अव्यये.

(हे फक्त शब्द संपताना. जोडशब्दांच्या (समासांच्या) मध्ये हे शब्द येतात तेंव्हा काय करायचे याचे नियम निराळे. म्हणजे मग बुद्धी तर बुद्धिमान का, आणि कवी तर कविमन का हे नंतर पाहू!)

२) 'इत' प्रत्ययाने (suffix) संपणारी सर्व विशेषणे र्‍हस्वोपांत्य आहेत. म्हणजे शेवटच्या अक्षराच्या आधीचे अक्षर र्‍हस्व असते. ज़से की: संपादित (संपादीत नव्हे), आधारित (आधारीत नव्हे), व्यथित (व्यथीत नव्हे)

अपवाद: गृहीत

३) 'ईक' प्रत्ययाने (suffix) संपणारी सर्व विशेषणे दीर्घोपांत्य आहेत. म्हणजे शेवटच्या अक्षराच्या आधीचे अक्षर दीर्घ असते. ज़से की: ऐतिहासिक (ऐतिहासीक नव्हे), शारीरिक (शारीरीक नव्हे)

(हे फक्त अधिक उत्साही लोकांसाठी

वरील ३ मधील प्रत्यय लावून नामाचे विशेषण होताना, शब्दातील पहिल्या स्वराच्या आधी अ हा स्वर लागतो. त्यामुळे पहिले, आणि प्रत्ययामुळे शेवटचे इतकीच अक्षरे बदलतात. शब्दातील बाकीची सर्व अक्षरे तशीच राहतात.

ज़से की:

इतिहास या शब्दात पहिला स्वर इ आहे, त्याच्या आधी आ आल्याने आ + इ = ऐ होते, आणि इक प्रत्यय लावून ऐतिहासिक हा शब्द तयार होतो.

शरीर या शब्दात पहिला स्वर अ आहे. (श् + + र् + ई + र्+ अ.) त्याच्या आधी आणखी एक अ आल्याने, अ + अ = आ होतो, आणि इक प्रत्यय लावून शारीरिक हा शब्द बनतो.

अध्यात्म या शब्दात पहिला स्वर अ आहे. त्याच्या आधी आणखी एक अ आल्याने, अ + अ = आ होतो, आणि इक प्रत्यय लावून आध्यात्मिक हा शब्द बनतो. (अध्यात्मिक नव्हे!)

भूत या शब्दात पहिला स्वर ऊ (भ् + ) आहे. त्याच्या आधी एक अ आल्याने अ + ऊ = औ बनतो, आणि इक प्रत्यय लावून भौतिक हा शब्द बनतो. (पुढे भौतिक या विशेषणाला 'अधि' हा उपसर्ग (suffix) लागून अधिभौतिक हे विशेषण बनते. आधिभौतिक नव्हे!)

हृद या शब्दात पहिला स्वर ऋ आहे (ह् + ). त्याच्या आधी एक अ आल्याने अ + ऋ = आर् बनतो, आणि इक प्रत्यय लावून हार्दिक हा शब्द बनतो.)

हे पहिले तीन नियम समज़ले तर अधिक काही लिहिता येईल.

आपला,

मराठा.