मी पुण्याहून आलेल्या कोण्या डॉक्टरांचे एक व्याख्यान ऐकले होते. बहुधा ते वर्तकच असावेत. अत्यंत हजरजबाबी व हुशार (क्लेव्हर या अर्थाने) मनुष्य. समोरच्या माणसावर कशी छाप पाडावी यात तरबेज. आपली विद्वत्ता दाखवण्यासाठी अचाट संदर्भ देणे, बारीक सारीक तपशील सांगून त्याला जेरीस आणणे, अडचणीत आल्यास कुशलतेने दुसरीकडे लक्ष वळवणे, असे अनेक उपाय त्यांनी चांगल्या प्रकारे आत्मसात केलेले होते. त्यामुळे त्यांचा सूक्ष्म देह धारण करून चंद्रावर भ्रमण करणे वगैरे बकवास सर्व सुशिक्षित श्रोत्यांनी अवाक होऊन कान टवकारून ऐकतांना पाहिले. त्यांनी "प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून " दिलेली माहिती मात्र सर्वसामान्य वर्तमानपत्रे व मासिके यांत आलेल्या लेखांमध्ये वाचल्यासारखी वाटली. सखोल माहिती घेण्यासाठी लागणारी जड उपकरणे हा सूक्ष्म देह कसा बरे वाहून नेणार?