'माणूस..' जशीच्या तशी इथे टंकणे यामागे काय उद्देश आहे?

जी.ए. म्हणजे काहीतरी गूढ, अतर्क्य आणि कंटाळवाणा अतिजड गंभीर मामला आहे, अशी (गैर)समजूत असणारे बरेच मराठी वाचक आहेत (अगदी मनोगतवरसुद्धा). मराठी वाचनाची गोडी लागली की सुहास शिरवळकर, गुरुनाथ नाईक, एस.एम.काशीकर ते पु̮. लं., व.पु., रणजीत देसाई, शिवाजीराव सावंत ते मर्ढेकर, तेंडुलकर अशी वाचनाची अभिरुची वृद्धिंगत होत जाते - किमान ती तशी व्हावी असे मला वाटते. अर्थात हे फक्त एक उदाहरण झाले. मग सर्व समीक्षकांनी स्तुतीसुमने उधळलेले जी ए लेखन काही विशिष्ट वर्गाचेच लाडके का रहावे? माझ्या मते स्वतः जी.ए. जसे गैरसमजांचे बळी होते, तसे जी.एं. चे लिखाणही लोकांनी 'काहीतरी न कळणारे' म्हणून टाळलेले आणि टाळल्यामुळे न कळालेले असे होते. 'माणूस..' च्या निमित्ताने हा गैरसमज दूर करता आला तर पहावे आणि काही मूठभर वाचकांना जी.एं. चे इतर लेखन वाचण्याची इच्छा व्हावी असा माझा प्रयत्न आहे. 'माणूस...' ही जी.एं. च्या एकंदर लेखनगुणाचे प्रतिनिधित्व करणारी कथा आहे, असे मला वाटते.  

लोकांना जी.ए. हे काय रसायन आहे हे कळावे यासाठी मला हा सगळ्यात सोपा मार्ग वाटला. जी.एं. च्या साहित्यावर चर्चाविषय हा पुन्हा ज्यांनी जी.ए. वाचलेले आहेत त्यांचासाठीच ठरला असता.

जी.एं. च्या लेखनातल्या वाचताना लक्षात न आलेल्या कितीतरी जागा मला ही कथा टंकीत करताना सापडल्या. त्यामुळे त्याचे मला ओझे वाटले नाही. उरतो प्रश्न तो कॉपीराईटचा. मला खरोखर याचे उत्तर माहीत नाही. पण माहितीजालावर इतर साहित्यीकांचे जसेच्या तसे उतरवलेले साहीत्य आहे. (उदा. अंतू बर्वा) जाणकारांनी यावर अधिक प्रकाश टाकल्यास बरे.

'माणूस...' ची बलस्थाने यावर 'माणूस..' संपल्यावर चार शब्द लिहावे, असा मानस आहे.

नाही म्हणता म्हणता प्रतिसाद बरेच झाले. म्हणजे तो विषय संपला असे म्हणायला हरकत नाही!