१. मराठीने इंग्रजी व हिंदी भाषेतले अनेक शब्द कुरकुर न करता सामावून घेतले आहेत.

येथे एक लक्षात घेण्यासारखे आहे ते हे की हे शब्द (उदा बँक, टेबल फाईल इ.) मराठीत सामावून घेताना त्या शब्दांनी मराठीच्या घरात प्रवेश करताना आपल्या परकीय चपला बाहेर काढून ठेवल्या आहेत आणि मराठीच्या व्याकरणाचे नियम ते शब्द घरातल्या शब्दांसारखेच पाळतात, तेंव्हा ते आता मराठीच आहेत असे म्हणायला हवे. उदा. आपण बँकमधे टेबलवर फाईल्स आहेत असे न म्हणता बँकेमध्ये टेबलावर फायली आहेत असे कमीपणा न येता म्हणतो.

परकीय शब्द जसेच्या तसे स्वीकारताना असे करायला हवे असे मला वाटते. शासनाच्या ज्ञानकोशात 'इलेक्ट्रॉनांची संख्या' असे वापर केलेले आहेत ते अतिशय योग्य आहेत असे मला वाटते.

२. घर्मशाळा, बहिस्रोत वगैरे

 "जोवर पटेल असा शब्द सापडत नाही तोवर सुचवलेला वापरायचाच नाही", हा एक दृष्टिकोन असू शकतो. किंवा "दुसरा अधिक अनुरूप शब्द मिळेपर्यंत सुचवलेला शब्द हक्काने वापरू" असा दुसराही दृष्टिकोन असू शकतो.

हेच शब्द कुणा मान्यवराने सुचवले तर ते लवकर स्वीकारले जातात हे खरेच. उदा. लोकमान्यांनी, सावरकरांनी, ना. सी. फडक्यांनी सुचवलेले असंख्य शब्द, किंवा अलीकडच्या काळात वर्तमानपत्रांनी प्रसृत केलेले 'धनदांडगे','चंगळवाद' इत्यादी शब्द.