वाह दिगम्भा आणि सन्जोपराव ! आठवणींच्या पसाऱ्यात पाऽऽऽर मागे दडलेला चित्रपट किती सुंदर पद्धतीने परत ताजा करवलात तुम्ही. कथा वाचायला सुरूवात केली आणि हळूहळू आठवत गेलं की हा चित्रपट मी पाहिला होता असं.. अर्थात आठवणी खूपच धूसर झाल्या आहेत. हिरोहिरोईनपेक्षा कथेलाच जास्त महत्त्व देत असल्याने असेल कदाचित किंवा नावं लक्षात ठेवण्याच्या फंदात सहसा मी पडत नसल्याने मला राजकपूर-वहिदा नाही आठवले. गाणी ऐकली बऱ्याचदा आहेत पण जास्तवेळा पाहण्यात मात्र आलेली नाहीत, हेही एक कारण असू शकते. असो.
दिगम्भा, तुमची खेळाडू वृत्ती आणि सन्जोपराव - भाष, तुम्हा दोघांची अगदी प्रसंगानुरूप सटीक उपमा देण्याची हातोटी भारी आवडली आणि त्यामुळेच कुमार - वसंतरावांच्या साथीत केळीच्या पानावरील तूपाच्या धारेने नटून सज्ज असलेल्या मऊसूत पुरणपोळीचा आस्वाद घेतघेत 'तीसरी कसम' वाचल्याचा आनंद आणखीन सुंदरपणे अनुभवता आला !
दिगम्भा, तुम्ही इतकं सुंदर रसग्रहण समोर ठेवल्यावर कथा मिळवून वाचल्याशिवाय चैन पडणार तरी कसं?! याच शनिवार-रविवारी रेणुजींच्या पुस्तकांची शोधाशोध सुरू करावी म्हणते आहे. आणि हो.. इतकं सुंदर रसग्रहण करण्यापासून तुम्हाला अडवू पाहत, 'तुमचा घास नाही' असं म्हणणाऱ्या तुमच्या मनालाच गऽऽप बसायला सांगून, असेच सुरेख लेखन करत रहा, ही मनापासून विनंती.
मला सुंदरसुंदर लेखन वाचायला मिळत रहावं असं 'मन मे समा'वल्यानेच जणू काही 'दुनिया बनानेवाल्या'ने ही 'दुनिया बनायी' असावी, असं माझ्या कूपमंडूक मनाला आत्ता या क्षणी वाटत आहे !