माझं आजोळ कुलाबा जिल्ह्यांत (आताचा रायगड).  तिथले भाताचे पीक आणि कोळंबा तांदूळ फार प्रसिद्ध आहेत.  माझ्या आजीच्या हाताची चव फार आगळीच होती.  दडप्या पोह्याची तिची कृति रोहिणीताईंच्या कृतीपेक्षा वेगळी होती.  त्यात फोडणी न घालता तेल तिखट आणि काळा मसाला ती घालीत असे. पोह्यामध्ये सर्व साहित्य घालून ते मुरण्याकरिता त्यावर पाटा उपडा घालून (दडपण ठेवून) ते मुरू द्यायचे म्हणून त्याला दडपे पोहे असे नाव होते. 

पोहे हे बोडक्याच्या भाताचे बनवीत असत. (बोडका ही एक जाडसर पण खमंग भाताची जात आहे).  तेव्हा गिरणीतून पोहे करून आणण्याची प्रथा नव्हती.  घरीच गरम आधणाच्या पाण्यात भात भिजवून मग ते उखळात किंवा उखळींत कांडून त्याचे पोहे करीत.  दोन दोन कांडपिणी एकाच उखळात एकाआड एक मुसळाचे घाव घालत असता तालबद्ध आवाज करीत ते ऐकायला फारच गंमत असे.

कलोअ,
सुभाष