तुमचं म्हणणं आणि तुमच्या मैत्रिणीचं म्हणणं दोन्ही आपापल्या जागी खरं आहे. आजी, बहीणीला दुखवी नये असे जर तुम्हाला वाटत असेल तर योग्यच आहे. परंतु प्रत्येकाची गरज, आवडनिवड ही वेगळी असते. दोन माणसांच्या एकाच गोष्टीबद्दल भावनाही वेगळ्या असतात.
ज्यांना हौस असेल त्यांनी रुखवत करावं आणि ज्यांना नसेल त्यांनी करू नये
हेच खरं. कारण ज्यांना हौस आहे त्यांनी रुखवत केलं तर ते कालबाह्य होणार नाही. परंतु ज्यांना हौस नाही किंवा रुखवत करण्याची गरज वाटत नाही त्यांच्यावर ते थोपवू नये.
मला असं वाटतं की एखाद्या माणसाने खूप प्रेमाने एखादी भेटवस्तू दिली म्हणून ती दुसऱ्याला आवडेलच किंवा त्याच्या उपयोगाची असेलच असे नाही. उदा. काकूने ट्वीन साइझची चादर पेंट केली पण मुलीच्या नव्या घरी किंग साइझचा बेड आहे तर तिने त्याचे काय करावे? म्हणजे ती चादर कपाटात टाकली जाईल. काकूने दिली म्हणून ती इतर कोणाला पुनर्भेट म्हणून देता येणार नाही आणि तिचा इतर उपयोग केला तर कदाचित काकू दुखावेल. म्हणजे काकूचे कष्ट, पैसे, भावना वाया गेलेच पण त्या गोष्टीचा योग्य वापरही करता आला नाही. (याउलट गोष्ट सांगते, माझ्या मैत्रिणीच्या परदेशी असणाऱ्या एका मामीने एका अतिशय सुरेख डबलबेडच्या चादरीवर विणकाम करून नणंदेला भेट दिली. आता माझ्या मैत्रिणीच्या घरी त्यावेळेस डबलबेडच नव्हता, तेव्हा चादरीचं करायचं काय यावर बराच विचार करून तिच्या आईने ती नवी कोरी चादर फाडली आणि पोरीला स्कर्ट शिवला. हे उदा. रुखवताचे नाही, चादरीवरून सहज आठवले. सांगण्याचा मुद्दा हा की तुम्ही प्रेमाने दिलेली भेटवस्तू समोरच्याला हवीच असेल असे नाही.)
आपल्या सण समारंभात अशा वस्तू भेटीदाखल देण्याची जी प्रथा आहे ती मला पटत नाही. याउलट समोरच्या माणसाची गरज पाहावी. (इथे समोरचा माणूस तुमचा जवळचा नातेवाईक आहे असे धरते, कारण चर्चा रुखवतावर सुरू आहे.) भारतात लग्न हे मुला-मुलीत अजूनही होत नाही. तिथे काका, काकू, आत्या, मामा, मामी यांचे मानापमान पाहावे लागतात, त्यांच्या सुचवण्या (वेगळ्या शब्दांत नाक खुपसणे) लक्षात घ्याव्या लागतात. यांत वाईट आहे असेच नाही पण हे करताना मुलगा आणि मुलगी यांना काय हवे आहे हे फारसे विचारांतच घेतले जात नाही. आपल्या लग्नसमारंभातल्या बऱ्याचशा रुढी कालबाह्य आहेत किंवा त्या उपचारादाखल केल्या जातात. एखाद्याला त्या पटतीलच असे नाही किंवा त्यांची गरज भासेलच असे नाही. रुखवतात केलेले खाण्याचे बरेचसे पदार्थ शोभेचे असतात व नेहमीच खाल्ले जातात असं वाटत नाही.
त्यापेक्षा आपल्या जवळच्या नातेवाईकाला लग्नात तुला काय हवं किंवा नव्या घरांत इंटीरिअर होतंय त्याला साजेसं काही माझ्या बजेटमध्ये बसेल तर घेऊन देते हे सांगणं मला आवडेल. जुन्या प्रथा बदलून नव्या घराला काय काय दिलं असं जर एखाद्याची मांडून ठेवून दाखवण्याची इच्छा असेल तर जरूर दाखवावं; पण ते दोन्ही बाजूंनी व्हायला नको का? म्हणजे मुलाच्या आत्येने किंवा काकूने अशी अशी भेट दिली याचे कौतुक मुलीकडच्यांनाही करू द्या की.
असो.
लग्न ठरलं म्हणजे आपले संबंध फक्त होणार्या नवर्याशी सांभाळण्याचा प्रयत्न करण्याबरोबरच आपल्या विद्यमान नातेवाईकांशी सुद्धा सांभाळले पाहिजेत. यासाठी जर रुखवत एक माध्यम ठरत असेल तर त्यात नकार देण्यासारखं काय असतं.
याचा अर्थ मात्र लागला नाही.