भारतात लग्न हे मुला-मुलीत अजूनही होत नाही. तिथे काका, काकू, आत्या, मामा, मामी यांचे मानापमान पाहावे लागतात, त्यांच्या सुचवण्या (वेगळ्या शब्दांत नाक खुपसणे) लक्षात घ्याव्या लागतात. यांत वाईट आहे असेच नाही पण हे करताना मुलगा आणि मुलगी यांना काय हवे आहे हे फारसे विचारांतच घेतले जात नाही.

अधोरेखित भागाशी असहमत. बाकीचे मुद्दे पटले.

डबलबेडच्या साईज़ची चादर आणि डबलबेड नसणे / ट्विनसाइझचा बेडशीट आणि किंगसाइझ बेड / उपयोग नसल्यामुळे बेडशीट फाडून स्कर्ट बनवावा लागणे वगैरे उदाहरणे तर टिपिकल. घरोघरी मातीच्याच चुली!

आणखी एक मुद्दा लक्षात घेतला जात नाही. समजा वधूवर परगावी/परदेशी स्थायिक होणार असतील. या परिस्थितीत त्यांना जर भरपूर प्रमाणात अवजड/आकाराने मोठ्या वगैरे वस्तू मिळू लागल्या, तर नंतर त्या सर्व वस्तू इष्टस्थळी हलवताना वधूवरांना होणारा त्रास / आर्थिक भुर्दंड (विशेषतः परदेशाच्या बाबतीत*) याचा भेटवस्तू देणारे विचार करतात का?

*परदेशाच्या बाबतीत जिथे माणशी दोन बॅगा आणि बॅगेमागे २३ किलो ही मर्यादा आहे, आणि यापेक्षा अधिक झाल्यास वजनवार दणकट अतिरिक्त आकार भरावा लागतो, तिथे बिचारे वधूवर मिळालेल्या भेटवस्तूंपैकी कायकाय म्हणून बरोबर नेणार? (आणि हे झाले अमेरिकेबाबत. इतर देशांच्या बाबतीत, विशेषतः युरोपात, नेता येणाऱ्या सामानाच्या वजनाच्या बाबतीत याहूनही वाईट निर्बंध आहेत.) म्हणजे मग अर्ध्याअधिक गोष्टी मागे सोडून जाणे आले. मग त्या भेटींचा उपयोग काय?

आणि समजा वजनाचा / आकाराचा मुद्दा बाजूला ठेवला, अगदी त्याच गावात वधूवर स्थायिक होणार आहेत असे जरी मानले, तरी समजा ५० जणांकडून ५० बेडशीट्स भेट म्हणून मिळाल्या, तर बिचारे वधूवर त्याचे नेमके काय करणार?

भेट देणाऱ्याच्या भावनांना महत्त्व आहेच, पण भावनेबरोबर थोडी अक्कलही वापरली तर नेमके काय बिघडते? आणि काहीही करून भेट देणे महत्त्वाचे, की ज्याला भेट द्यायची त्याची आवड तर सोडाच, पण सोय-गैरसोय महत्त्वाची?

पण हा विचार आपल्याकडे कदापि केला जाणार नाही. कारण आपल्याकडे लग्न हे मुलामुलीचे नसतेच मुळी! लग्न हे दोन्ही बाजूच्या नातेवाइकांचे असते. वधूवर हे केवळ निमित्तमात्र असतात. त्यांच्या पुढच्या आयुष्याची (कदाचित काही अगदी जवळचे अपवाद सोडल्यास) फारशी कोणाला पर्वा नसते. भेट देणे ही एक पद्धत ('जनरीत'!) असते. मग मी अधिक महागडी / impressive / 'कल्पक' भेट देतो की दुसरा कोणी, वराच्या बाजूचे देतात का वधूच्या बाजूचे, याचीही अहमहमिका बऱ्याचदा होते. (त्याचा वधूवरांना काही उपयोग आहे का याचा विचार करायचा नसतो. केवळ स्वतःच्या ऐपतीचे प्रदर्शन असते.) रुखवत हे तर याचे केवळ जाहीर प्रदर्शन होय.

तसे म्हटले तर आपल्याकडे लग्न हीच मुळात बऱ्याचदा एक पद्धत ('जनरीत'!) असते असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. लग्न ही चारचौघांत चांगले कपडे घालून मिरवण्याची, मानपानाची, झालेच तर दोन्ही बाजूंच्या हौशी मंडळींनी आपापले 'विविध गुणदर्शन' करण्याची एक संधी असते - वधूवर / त्यांचे लग्न हे केवळ एक निमित्त असते. (या बाकीच्या घडामोडी - मानपान सोडल्यास - यांच्यात निश्चित काही गैर आहे असे नाही, पण घडणाऱ्या लग्नाला उपस्थितांच्या लेखी याहून अधिक महत्त्व नसावे - विशेषतः वधूवरांबद्दल - हे खटकते.) आणि म्हणूनच आपल्याकडे लग्न हे मुलामुलीचे नसून दोन्ही बाजूच्या 'आप्तां'चे होते, हे निश्चित वाईट आहे, असे वाटते.

वधूवरांच्या सोयीबद्दलच बोलायचे झाले, तर सर्वात उत्तम म्हणजे (देणाऱ्याच्या इच्छेप्रमाणे आणि ऐपतीप्रमाणे) रोख रक्कम देणे सर्वात इष्ट. मग वधूवर आपल्या सोयीप्रमाणे त्याचे वाटेल ते घेऊ शकतात. नाहीतर वस्तूच द्यायच्या असतील, आणि वधूवर त्याच गावात राहणार असतील, तर (वरकरणी कितीही विचित्र वाटली तरी) अमेरिकेतल्याप्रमाणे 'वेडिंग रजिस्ट्री'ची पद्धत सुरू केल्यास उपयुक्त ठरावी.

वेडिंग रजिस्ट्री म्हणजे, लग्नाआधी वधूवर आपल्याला भावी आयुष्यात लागणाऱ्या/उपयुक्त ठरणाऱ्या आणि ज्या भेट म्हणून मिळाव्या अशा वाटतात अशा सर्व वस्तूंची यादी बनवून, एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये (जिथे या सर्व वस्तू मिळतात) जाऊन ती यादी नोंदवतात. (जसे, अमूक‌अमूक डिझाइनच्या पंचवीस कपबशा, अमूक रंगाची/डिझाईनची/साइझची एक बेडशीट, तमूक रंगाची/डिझाईनची/साइझची दुसरी बेडशीट, अमूक कंपनी/मॉडेलचा एक मिक्सर, तमूक कंपनी/मॉडेलचा एक नॉनस्टिक भांड्यांचा सेट, वगैरे.) एकाच दुकानात यादीतील सर्व वस्तू मिळत नसल्यास, दुकानवार याद्या बनवून वेगवेगळ्या ठिकाणी नोंदवल्या जातात. भेट देणाऱ्याने त्या दुकानात जाऊन यादीतल्या कोणकोणत्या गोष्टी अगोदरच विकत घेतल्या गेल्या आहेत हे पाहून, उरलेल्या गोष्टींपैकी एखादी गोष्ट आपल्या इच्छेप्रमाणे/ऐपतीप्रमाणे विकत घ्यायची, आणि तशी यादीत नोंद करायची, म्हणजे आणखी कोणीतरी तीच वस्तू पुन्हा विकत घेत नाही. दोनतीन जणांनी पैसे एकत्र करून एखादी वस्तू सामायिकरीत्या विकत घेतली, तरी चालते. तसेच, समजा ठराविक डिझाइनच्या पंचवीस कपबशांची नोंद आहे, आणि माझी तेवढी ऐपत नाही, पण समजा त्या सेटमधल्या तीन कपबशा मी घेऊ शकतो / इच्छितो, तर तसेही करण्याची बऱ्याचदा मुभा असते. (ती वस्तू एकक म्हणून विकली जाते की संच म्हणून, यावर अवलंबून आहे.) मग उरलेल्या बावीस कपबशा इतर कोणीतरी (किंवा इतर बावीस जणसुद्धा) विकत घेऊ शकतात.

याउपरसुद्धा रोख रक्कम / गिफ्ट कार्डे वगैरे या भेटी म्हणून कधीही दिल्या जाऊ शकतातच.

ही पद्धत कितीही विचित्र वाटली, तरी त्यात नेमक्या वधूवरांना आवश्यक / उपयोगी / इच्छित असलेल्या वस्तूच आणि त्याही आवश्यक / उपयुक्त / इच्छित असलेल्या संख्येत / प्रमाणातच मिळतात (तीच वस्तू अनेकांकडून अनेकदा मिळत नाही), हा एक मोठा फायदा आहे. शेवटी भेट देण्यामागे जर भेटीचा वधूवरांना संसारासाठी काही उपयोग व्हावा, हीच जर भावना असेल, तर हा एक चांगला मार्ग आहे, असे वाटते.

अवांतर: वेडिंग रजिस्ट्रीच्या यादीतल्या सर्व वस्तू विकत घेतल्या न गेल्यास उरलेल्या वस्तूंचे नेमके काय केले जाते (म्हणजे वधूवरांना त्या स्वखर्चाने विकत घ्याव्या लागतात, की न घेतलेल्या चालतात), याबाबत अंधारात आहे. तज्ज्ञांनी खुलासा करावा.