मला वाटते या कथेतील जी एंचे सामाजिक भाष्य आपल्या समाजाच्या वैचारिकतेबद्दलचे , एका कलानिष्ठ, व्यासंगी, मार्मिक मनाच्या परंतु लौकिकार्थाने अयशस्वी, त्या अयशस्वितेने, सभोवतालच्या निबर सामजिकतेने कटुता आलेल्या व्यक्तिच्या चष्म्यातून केलेले आहे. प्रबोधनाच्या अंगाने जाणारे, सामाजिक सुधारणेकरता केलेला हा आक्रोश नव्हेच. या कथेच्या निमित्ताने, दत्तूच्या व्यक्तिरेखेद्वारे खुद्द जी एच आपल्याला भेटत आहेत यात मला बिलकुल शंका वाटत नाही. (या गोष्टीची येथे मी नम्रपणें नोंद करू इच्छितो की, दत्तूच्या वैयक्तिक आयुष्याच्या हर्षमर्षांतून जी एंच्या आयुष्याकडे जाण्याचा माझा गर्हणीय हेतू बिलकुल नाही. जिथे जिथे म्हणून द्त्तूचे सभोवतालच्या परिस्थितीबद्दलचे भाष्य येते तिथे जी ए येतात एव्ह्ढेच माझे म्हणणें).