भारतात लग्न हे मुला-मुलीत अजूनही होत नाही. तिथे काका, काकू, आत्या, मामा, मामी यांचे मानापमान पाहावे लागतात, त्यांच्या सुचवण्या (वेगळ्या शब्दांत नाक खुपसणे) लक्षात घ्याव्या लागतात. यांत वाईट आहे असेच नाही पण हे करताना मुलगा आणि मुलगी यांना काय हवे आहे हे फारसे विचारांतच घेतले जात नाही.

यांत वाईट आहे असेच नाही हे म्हणण्याचे कारण की सर्वच सुचवण्या वाईट नसतात. माणसं अनुभवी असतात आणि बरेचदा आपुलकीने सूचना देतात.

खालचा प्रतिसाद चर्चेवर टीका करण्याच्या उद्देशाने नाही परंतु वरील प्रतिसाद वाचून काही मुद्दे आठवले म्हणून व्यक्तीगत मत देत आहे.

आपल्याकडे लग्न होणे हा एक अतिमहत्त्वाचा टप्पा मानला जातो. तेव्हा लग्न काय आयुष्यात एकदाच होणार आहे म्हणून जी काही हौस मौज आहे ती करून घ्या असे सांगितले जाते. (लग्न आयुष्यात एकदाच होते या नियमाप्रत माणसे का पोहोचतात कळत नाही, त्याही पुढे लग्न झालंच पाहिजे नाहीतर स्वर्गप्राप्ती होणार नाही असंही लोकांना वाटतं की काय कळत नाही.) खरंतर लग्नात होमाजवळ बसून घामाघूम झालेले, मुंडावळ्या आणि टोपी खाली दडलेला नवरदेव आणि हळदी कुंकवाच्या माऱ्याने अंबाबाई झालेली वधू नक्की किती हौस करून घेत असते देवास ठाऊक. पण बाकी नातेवाईक मात्र मिरवून घेत असतात. त्यातलाच एक प्रकार रुखवत. बरं तो करतात मुलीकडची मंडळी, कारण काय तर हौस मौज. म्हणजे मुलाला हौसमौज नसते? तर मग समजा मुलगा मुलगी लग्नानंतर वेगळे राहणार असतील तर मुलाकडची मंडळी का नाही मांडत रुखवत? त्याला येत नाही आपल्या आईवडिलांची आणि भावंडांची आठवण? की त्याच्या आईला प्रेमच नसतं पोराचं?

आता रुखवताकडे पुन्हा पाहायचे झाल्यास, समजा पमीने ताईच्या लग्नात स्वत: खपून लाडू केले म्हणून पमीच्या मावशा, काकू, माम्यांनी तिचे कोण कौतुक करणे क्रमप्राप्त आहे. परंतु पमीच्या ताईच्या सासूबाईंनी त्याचा घास जर तोंडात घेतला आणि त्यांची प्रतिक्रिया मनातल्या मनात 'अरे देवा! हे असं काहीतरी भलतंच खावं लागणार की काय माझ्या सोन्याला उद्यापासून?' अशी झाली तर काय घ्या? तिथे मग 'पाहिलंत आज नाही लग्न होत तर सासूचं तोंड वाकडं.' असे उद्गार ऐकू येतात आणि हे जर सासूच्या कानावर गेलं तर त्या 'आज नाही लग्न होत तर लागल्या मुलीचे कान भरायला.' असं म्हणणार. एकंदरीत इतरांना खूश करणे ही गोष्ट फारशी सोपी नसते. ती मनापासून केली तरी किंवा हौसेखातर केली तरी.

हा जरी माझा कल्पनाविलास असला तरी सांगण्याचा मुद्दा हा की काय करावं, कसं करावं, काय आवडावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आपल्याला पटतं ते करावं नाही पटतं ते सोडून द्यावं, आणि या सोडून देण्यावरच आपण मार खातो. कधी नात्याचे, वयाचे, हौसे मौजेचे दाखले देऊन मुलामुलीवर भावनिक दडपण आणले जाते. आजीने प्रेमाने केलं असतं, ताईने आवडीने केलं पण तुला कदरच नाही इ. इ. यांत त्या मुलीला आणि तिच्या होणाऱ्या नवऱ्याला काय हवंय याचा विचार असतोच कुठे? बहिणीने केलेली फ्रेम भिंतीवर बरी दिसेल असं मुलीला वाटलं तरी तिच्या होणाऱ्या नवऱ्यालाही तसंच वाटेल असं कशावरून? आपल्या घराबद्दल, फर्निचरबद्दल जर त्याच्या काही कल्पना असतील तर तोच बायकोला सांगू शकतो की तुझ्या ताईची फ्रेम इथे नको.

लग्नात येणाऱ्या भेटवस्तूबद्दलही असंच. जवळचे नातेवाईक विचार करून विचारून भेट देतात असे समजू. आपल्या जवळच्या माणसांना आपल्यासाठी काहीतरी करावंसं वाटतं, प्रेमाने देवाणघेवाण होते हे खरं, काही प्रमाणात योग्यही आहे; पण म्हणून लग्नाला येणाऱ्या प्रत्येकाकडून भेटवस्तू उकळण्याची गरज असते का? वडिलांच्या ऑफिसमधला सहकारी नाहीतर आईच्या महिला मंडळातील एक ताई यांना मुला-मुलीने कधीही पाहिलेलं नसतं पण आई वडिलांनी त्यांना लग्नाचं आमंत्रण दिलंय म्हणून त्यांच्याकडून भेटवस्तू का स्वीकाराव्या  हेच मला कळत नाही. लग्न तुम्ही (तुम्ही म्हणजे चर्चाप्रवर्तक नाही)   करता, आनंद तुमचा, आनंदाप्रीत्यर्थ तुम्ही लोकांना सहभागी होण्याच आमंत्रण देता आणि त्यांच्याकडून भेटवस्तू घेता. नो प्रेझेंट्स प्लीज लिहिलं तर मग नको त्या भेटवस्तू येणारच नाहीत. (जशा ५० चादरी किंवा नको ते कपडे, साड्या इ.) नको असलेल्या भेटवस्तूंच काय करायचं हा एक मोठा प्रश्न असावा.

बाकी, वेडिंग रजिस्ट्रीची कल्पना मलाही आवडते. त्यामुळे घरात कचरा सामान साठत नाही आणि हव्या त्या गोष्टी आल्याने त्याची आठवण अधिक राहते आणि राजीखुशीने गोष्टी घरांत येतात असे वाटते.