आठवण म्हणून कुणी दिले तर वाईट काहीच नाही हो.. प्रश्न आहे की ज्याने जी वस्तू दिली असेल तो त्या वस्तूत अडकलेला असतो आणि ज्याला देतो त्यालाही अडकवतो.
समजा आज मला घरातली जवळपास प्रत्येक वस्तू भेट आली. आणि ज्यांनी दिलीये त्यांनी कुठलीही रीत बीत म्हणून नाही तर प्रेमाने दिलीये. अर्थातच त्यांच्या प्रेमाचा आदर करणे म्हणजे त्या वस्तू वापरणे आले. किंवा किमान त्या प्रेमाचा आदर म्हणून त्या नंतर वापरण्यासाठी नीट ठेवून देणे आले. म्हणजे एकतर माझं घर जमवायला सजवायला मला काही स्कोपच(मराठी?) नाही. कारण भेट म्हणून आलेली वस्तू आवडली नाही म्हणून केवळ एक असतानाही दुसरी आणावी ही उधळपट्टीच की. आणि वापरायची नसेल नीट ठेवायची असेल तर तेवढ्या वस्तूंसाठी जागा करणे हेही आले. आज शहरातले जागेचे भाव बघता ऐसपैस हा शब्द ही एक कविकल्पना होऊ लागलीये. मग या बळंच प्रेमाच्या गोष्टी ठेवायच्या कुठे? जागेच्या टंचाईच्याच संदर्भात म्हणायचे झाले तर घर जेवढे सुटसुटीत ठेवले जाईल तेवढे मोठे दिसते, मोकळे वाटते मग या सगळ्या शोभेच्या वस्तूंची गर्दी करून ठेवायची उगाचच? का? कारण प्रेमाचा आदर? नाही हो.. ये तो ज्यादती है..
तुमचे एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर तुमची आठवण त्या व्यक्तीला वस्तू द्या नका देऊ रहाणारच आहे. पण एरवी लग्नात आहेर द्यायचा असतो या रितीपोटी देणाऱ्यांची संख्याच कुठल्याही लग्नात जास्त असते. नवीन जोडप्याला खरंच गरज आहे का हे न बघता इधर का माल उधर अश्या रितीने आलेल्याच गोष्टी खपवणे हेही आलेच. असो.. हा आहेराचा मुद्दा.. पण हेच रूखवताचेही सांगता येईल.
मुळात तुम्ही तुमच्या मुलीला वस्तूरूपात काय देता किंवा मुलगी किंवा घरातले इतर स्त्री सभासद किती गृहकृत्यदक्ष आणि कलाकुसर वाले आहेत याचे प्रदर्शन मांडायची गरजच काय?
मी एका रूखवतात एका कायनेटीक होंडा, गोदरेज चा फ्रीज, पार्लर ची खुर्ची(मुलगी ब्यूटी पार्लर काढणार होती हे समजावे), सिंगापूर ची हनीमून ची तिकिटे या सगळ्याबरोबर 'चिंतामणी' मधून करून घेतलेली मदालसा/वसंतसेना टाईप चित्राची भरतकाम केलेली फ्रेम असे प्रचंड विनोदी कॉम्बिनेशन(मराठी?) पाह्यले होते. आता ह्या सगळ्याचे प्रदर्शन मांडायची काय गरज?
अजून एका भावाच्या लग्नात वहिनीच्या एका आत्या का मावशीने लोकरीची ४-५ इंच व्यासाची अनेकरंगी फुले करून ती एका पिस्ता रंगाच्या चादरीवर लावली होती. इतकं भयंकर दिसत होतं ते. वहिनीने आजतागायत त्याला हवा लागू दिली नाहीये. ते विचित्र दिसत होतं हे तिलाही कळत होतं पण म्हणता येत नव्हतं आणि घरी आल्यावर आवरत असताना आम्ही काही त्याबद्दल बोलायच्या आधीच ती म्हणाली एकदा कुठेतरी पसरते आणि फोटो काढून पाठवून देते म्हणजे वापरली नाही असे व्हायला नको.
जरी हा ज्याच्या त्याच्या हौसेचा प्रश्न आहे हे, ही हौस नक्की कुणाची ग्राह्य धरायची? मुलीची/ मुलीच्या आईची/ आजीची/ इतर आत्यामावश्याकाकूमाम्यांची/ येणाऱ्या पाहुण्यांची/ नवऱ्यामुलाची/ वरमाईची/आजीची.... कुणाची?? कारण बऱ्याचदा असे दिसते की हौस एकाची आणि नवीन जोडप्याला सगळं सावरत बसावं लागतं.. जिथे खरतर त्यांनी एकमेकांना सावरायला शिकायचं असतं...