अनुप्रिता,

सुंदर शब्दात मांडून चांगला विषय ऐरणीवर घेतल्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन.

आपले काय मत आहे?

आपुलकीने, प्रेमाने कोणी रुखवताचे काही करून देतो/ते असे म्हटल्यास संबंधित व्यक्तीने आपले उत्तर ( होकारार्थी/नकारार्थी ) नम्रपणे सांगण्यात काहीच हरकत नसावी. झुरळ झटकावे त्याप्रमाणे 'इथून ओझं कोण नेणार!!!' अशी त्या व्यक्तीच्या भावनांची संभावना तरी खासच करू नये असं मनापासून वाटतं.

रुखवत 'मांडण्या'च्या काहीशी मीही विरोधात असले तरी ते रुखवताचे आजकालचे स्वरूप पाहून झालेले मत आहे. हंडे, कळशा, पातेली, दिवाण वगैरे गोष्टी रुखवतात ठेवणे यात कलात्मकतेपेक्षा श्रीमंतीचा बडेजावच जास्त ठळकपणे नजरेत भरतो, जो मला तितकासा पटत नाही. कलाकुसरीने बनवलेल्या वस्तू निश्चितच रुखवत म्हणून प्रदर्शित केल्या जाव्यात असे मला वाटते, जेणेकरून त्या क्षेत्रातली आवड असलेल्या मंडळी नविन सुंदर कलाकृती दिसल्यास त्यातून प्रेरणा घेऊन स्वतःची प्रतिभा वाढवू शकतात, 'हे कोणी केलं?' असं विचारून संबंधित व्यक्तीशी ओळख होऊन ओळखपाळखदेखील वाढवता येऊ शकते. अर्थात हा सर्व प्रकार जर लग्न वैदिक पद्धतीने होणार असेल तर उद्भवणारा आहे, ज्या पद्धतीला बरीच तरूण मंडळी जायला तयार होणार नाहीत असं वाटतं ( किती ती पैसा/वेळ/मॅनपॉवर आदी गोष्टींची नासाडी ! ).. त्यामुळे विवाहनोंदणी कार्यालयातच एक टेबल रुखवतासाठी ठेवायला हरकत नसावी असं वाटतं !!! ;-)

पुर्वीच्या काळी सर्व घरात सर्रासपणे एकत्र कुटुंबपद्धती असल्याने आणि सुखदु:खाला धावून जाणे वगैरे गोष्टींमुळे काकाकाकू, मामामामी, आत्याकाका, मावशीमावसा, आजीआजोबा वगैरे मंडळी सतत संपर्कात असायचीच, त्यामुळे प्रियाली म्हणाल्या त्याप्रमाणेच्या 'वेडिंग रजिस्ट्री'सारख्या संकल्पनेची गरज आपल्याला पडली नव्हती. आताच्या घडीला 'वेडिंग रजिस्ट्री'सारखी कल्पना रुजवायचा प्रयत्न करून किमान भारतात तरी भावनाप्रधान असलेल्या लग्नासारख्या कार्यक्रमाला व्यावसायिक रूप दिले जाऊ नये असे मला वाटते. यापेक्षा जे वधूवर-कुटुंबियांचे खरोखरच निकटवर्तीय आहेत ( म्हणजे जे नेहमी त्यांच्या संपर्कात असून त्यांच्या तत्कालिन भावना/गरजा जाणून आहेत असे ! ) त्यांनी त्यांच्या आवडनिवडीला/गरजेला केंद्रस्थानी ठेवून रुखवताचे सामान बनवावे आणि इतरांनी भेट द्यायचीच इच्छा/हौस असल्यास ती रोख पैशाच्या स्वरूपात द्यावी असे वाटते.

अवांतर : 'मालती' प्रकरण हे 'आजी' लोकांनाच जास्त झकास का येतं हे मला आजतागायत न उकललेलं कोडं आहे. कितीही छोटा गोळा घ्या, कितीही जज्जत तोडा, आजीने केलेल्या बारीक, सुंदर मालत्यांची सर माझ्या मालत्यांना येतच नाही. :-( अर्थात अजून माझा धीर खचलेला नाही.. प्रयत्न चालू आहेत. आजीच्या वयाची होईतो तरी नक्कीच साधेल बारीक आणि सुंदर मालत्या करायला असे वाटते. ;-)