काल वेदश्रीचा हा प्रतिसाद वाचला आणि आज सकाळी आकाशवाणीवर "दुनिया चलानेवाल्या"विषयीचे एक गीत ऐकले. दोन्हीचा काहीतरी संबंध लागतो असे वाटल्यामुळे येथे देत आहे. अति विषयांतर वाटल्यास काणाडोळा करावा.

सुरेश वाडकरने गायिलेले हे गोड गाणे पहिल्यांदा ऐकले तेव्हापासून मला अतिशय आवडलेले आहे. संगीतकार, कवी माहीत नाही (पूर्वी जसे सगळ्या गाण्यांचे कवी गदिमा वाटायचे - बिचाऱ्या शांता शेळके! - तसा आता सुधीर मोघे वाटतो).
मिळाल्यास अवश्य ऐकावे.

कुणा न दिसता कोण चालवी अवघा संसार
कळसूत्री बाहुलीं खेळवी कोण सूत्रधार

अपुले येणे, अपुले जाणे,
सहज बोलणे, मंजुळ गाणे,
अपुल्याकरवी तोच करवितो सारे व्यवहार,
कुणा न दिसता .....

आयुष्याचे रंगित नाटक
तोच तयाचा कर्ता नायक
अपार लीला त्याच्या, त्याचे अनंत अवतार,
कुणा न दिसता ....

ठाव तयाचा नसे माहिती
परी असे तो अवती-भवती
अपुला असुनी अनोळखी हा, जवळ असुनी दूर,
कुणा न दिसता ...

(मी आस्तिक नाही पण देव या कल्पनेचे मला फार आकर्षण आहे. म्हणजे "जवळ असुनी दूर" याचेच आणखी एक उदाहरण, नाही का?)